Thursday 11 March 2021

जिल्हा माहिती कार्यालयाच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन नागपूर दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सामाजिक, अर्थसहाय्य योजनांवर आधारित घडीपुस्तिकांचे प्रकाशन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अमरावती व नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर यांनी या घडीपुस्तिका तयार केल्या आहेत. सामान्य नागरिकांना आपल्या हक्काच्या न्याय्य योजनांची माहिती व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या घडीपुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. कोरोना आढावा बैठकीपूर्वी झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बसवराज तेली, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, मनपा सहआयुक्त उपायुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तर सांगावा समाज कल्याणाचा या अनुसूचित जाती घटक योजनेतील रमाई आवास घरकुल योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल वाटप,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना, कन्यादान योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना, भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे.
*****

No comments:

Post a Comment