Tuesday 23 March 2021

जागतिक क्षयरोग दिनाचे आज आयोजन

Ø क्षयरुग्णांसाठी योजना व सुविधा नागपूर, दि. 23 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्त क्षयरोगावर नियंत्रण करण्यासाठी 21 ते 30 मार्चपर्यंत जिल्ह्यातील तालुकामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच शासनाने क्षयरोग मुक्तीसाठी जास्तीत जास्त जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी तालुके ठरविण्यात आले असून या तालुक्यामध्ये क्षयरोग मुक्त गाव करण्यासाठी विविध उपक्रम राबविली जाणार आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त काही रुग्णामध्ये क्षयरोगाचे लक्षणे आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, सायंकाळी चढत जाणारा ताप, वजनात झालेली लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे, छातीत दुखणे आढळून आले तर थुंकी तपासणी करण्यात येत आहे. आवश्यकता असल्यास रुग्णांची सिबीनेट व ट्रुनेट तपासणी अत्याधुनिक मशीनद्वारे करण्यात येते. तसेच त्यांची यु-डिएसटी पण केली जाते. वेळेत उपचार होणे गरजेचे असून क्षयरोग बरा होणारा रोग आहे. शासकीय रुग्णालयात क्ष-किरण तपासणी करुन रुग्ण क्षयरोगग्रस्त असल्यास त्याला शासकीय रुग्णालयात मोफत उपचार दिले जाते. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद घेवून त्यांच्यावर उपचार करणे बंधनकारक असल्याने सर्व खाजगी डॉक्टर्स व पॅथॉलॉजी, रुग्णालयांनी शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. क्षयरुग्णांसाठी योजना व सुविधा निश्चय पोषण आहार योजनेंतर्गत सकस आहारासाठी दरमहा क्षयरुग्णाला पाचशे रुपये पूर्ण औषधोपचारादरम्यान सरळ बँकेत जमा करण्यात येतात. आदिवासी विभागातील क्षयरुग्णांसाठी सातशे पन्नास रुपये सरळ बँकेत जमा करण्यात येते. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्ण नोंदणी केल्यास पाचशे रुपये व पूर्ण औषधोपचार केल्यास पाचशे असे एकूण हजार रुपये बँकेत जमा करण्यात येते. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे शासनाची क्षयरोगाची डॉट्स औषधी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. कोरोना व क्षयरोगाची लक्षणे मिळती जुळती असली तरी सर्व रुग्णांनी लक्षणे न लपविता तसेच भीती दूर करुन क्षयरोगाविषयी स्वत:ची तपासणी करावी व त्वरित उपचार घ्यावे. तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे यांनी केले आहे. 00000

No comments:

Post a Comment