Wednesday 31 March 2021

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण वाढविणे हा सर्वोत्तम पर्याय - डॉ. नितीन राऊत

महानगर व जिल्ह्यातील अनेक केंद्रांना भेटी नागपूर, दि 31 : सातत्याने वाढणारे रुग्ण व मोठ्या संख्येने दगावणारे रुग्ण यामुळे नागपूर सध्या देशात कोरोनाच्या केंद्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून जिल्ह्यात उद्यापासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधासोबतच लसीकरण मोहिमेकडे बारकाईने लक्ष वेधावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी दहा वाजतापासून नागपूर महानगर तसेच नागपूर ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना भेटी दिल्यात. या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी आज महानगर परिसरातील इंदिरा गांधी हॉस्पिटल, काटोल रोड परिसरातील के. टी. हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, इमामवाडा आयसोलेशन केंद्र आणि उमरेड तालुक्यातील पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दिल्यात. या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्येक ठिकाणी संवाद साधला. कोरोना काळामध्ये जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेचे आभार मानताना त्यांनी लसीकरण हे आगामी काळात कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे कोरोना आजाराचा अधिक प्रभाव पडणाऱ्या वयस्क गटातील सर्व नागरिकांचे लसीकरण प्राथम्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी पाचगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी दाखविलेल्या उपस्थितीबद्दल आभार मानले. ज्यांनी लस घेतली त्यांनी लसीकरणाचे ब्रँड अँबेसिडर होत प्रत्येक गावांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचा प्रचार करावा. ज्यांनी ही लस घेतली नाही त्यांनीही लस घेण्यासाठी आग्रह करावा, उद्यापासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. इंदिरा गांधी हॉस्पिटल, के. टी. हॉस्पिटल, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इमामवाडा आयसोलेशन केंद्र या ठिकाणी त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साडेतीन लाखावर लोकांनी लसीकरणामध्ये सहभाग नोंदविला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार नाही. लसीकरणामुळे कोणालाही कुठला आजार झाला अथवा कुणाची प्रकृती बिघडल्याचे देखील पुढे आले नाही. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम असून प्रत्येकाने स्वतःच्या लसीकरणासाठी जागरूक राहावे, असे त्यांनी आवाहन केले. काही केंद्रावर त्यांच्याहस्ते लसीकरणाचे प्रमाणपत्रही नागरिकांना देण्यात आले. नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, अशी सर्व लोक प्रतिनिधींची मागणी आहे. या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केल्या जात आहे. काल 30 मार्च रोजी 9972 लोकांनी लस घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 59 हजार 943 लोकांनी लस घेतली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे या शहरानंतर सर्वात प्रभावीपणे नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरण होत आहे. *****

No comments:

Post a Comment