Thursday 18 March 2021

दस्तऐवज नोंदणीच्या मुद्रांक सवलतीचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

नागपूर, दि. 18 : महसूल व वन विभागाच्या 29 ऑगस्ट 2020 च्या शासन राजपत्रानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर अधिनियमास जोडलेल्या अनुसूचीच्या अनुच्छेद 25 च्या खंडान्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुदा्रंक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दोन टक्के तर 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या आणि 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दीड टक्क्यांनी कमी केले आहे. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी नागपूर ग्रामीण येथील एकूण 12 दुय्यम निबंधक कार्यालयात सवलत संपत असल्याने दस्तऐवज नोंदणीच्या तरतुदीनुसार मुद्रांक सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. नगर विकास विभागाच्या 31 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाअन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीसाठी एक टक्का इतका कमी तसेच 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीसाठी अर्धा टक्के इतका कमी करण्यात आला आहे. ग्राम विकास विभागाचे 28 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयान्वये, जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमान्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी शून्य टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2020 पर्यंत अर्धा टक्का करण्यात आले आहे. मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादीत केलेले व आवश्यक मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियमांच्या कलमानुसार दस्त निष्पादीत केलेल्या दिनांकापासून चार महिन्याच्या आत नोंदणीसाठी सादर करता येईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करावा, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कळविले आहे. 00000

No comments:

Post a Comment