Sunday 16 May 2021

लसीकरणाला निघतांना ज्येष्ठांनी घ्यावी काळजी - जिल्हाधिकारी

कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस ३ महिन्यानंतर नागपूर, दि. 16 : केंद्र शासनाच्या लसीकरणाबाबतच्या नवीन निर्देशाप्रमाणे आता कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेसमधील अंतर बारा ते सोळा आठवडे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाला निघताना कोव्हिशील्ड घेतली असेल आणि तीन माहिन्याचा कालावधी झाला असेल तरच लसीकरणाची तारीख व लसीची उपलब्धता लक्षात घेऊनच दुसऱ्या डोससाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. कोव्हिशील्डसाठी हा नियम असला तरी, कोव्हॅक्सिन लसीच्या यापूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. राज्यामध्ये कोविड लसीकरणाचा कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाला असून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या वयोगटांचे लसीकरण सुरू आहे. पूर्वी कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सुरूवातीला सहा ते आठ आठवड्यांचा अंतर ठेवण्यात येत होते. आता या लसीच्या दोन डोसमधील कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत घरातील तरुणांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करावे, असेही ते म्हणाले. लसीकरणासंदर्भात सध्या 45 वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी लसीकरण करण्याच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र केंद्र सरकारने लसीकरणासंदर्भातील नियम सध्या बदलविले आहे. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी कोव्हिशील्ड लसीचे लसीकरण झाले आहे. या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. अनेक जण तीन महिन्यांचे अंतर लक्षात न घेता लसीकरण केंद्रावर पोहोचत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून नागरिकांनी या काळामध्ये घराबाहेर पडताना आपल्या लसीकरणाच्या नेमक्या तारखा, लसीची उपलब्धता लक्षात घेऊन बाहेर पडावे, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. *****

No comments:

Post a Comment