Friday 21 May 2021

म्युकरमायकोसिसला सहज ठेवता येते दूर - डॉ. प्रशांत निखाडे

• म्युकरमायकोसिस आजाराच्या जनजागृती अभियानाला सुरुवात नागपूर, दि. 21 : काळी बुरशी अर्थात म्युकर मायकोसिस हा आजार आपण सहजपणे दूर ठेवू शकतो. रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि काळजी यातून कोरोना व म्युकरमायकोसिस हा आजारही दूर राहू शकतो. परंतु, जनतेने कोरोनातून बरे झाल्यानंतर काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे विदर्भ कान, नाक, घसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनामधून बरे झालात पण म्युकरमायकोसिसपासून काळजी घ्या, यासंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन सुरु करण्यात आले आहे. विदर्भ कान नाक घसा संघटनेच्या अध्यक्षांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. कोरोना विषाणू, कोरोनानंतर घ्यावयाची काळजी, म्युकरमायकोसिस आजार व घ्यावयाची दक्षता तसेच तिसऱ्या संभाव्य लाटेसंदर्भात वैद्यकीय सज्जता याबाबत आशा वर्करपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी – कर्मचारी तसेच जनतेसाठीसुद्धा विविध माध्यमांद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ. प्रशांत निखाडे म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे घाबरु नका. हा रोग वातावरणातून शरीरात येतो. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झाला, अशांना म्युकरमायकोसिसचा त्रास होत आहे. शरीरात तीन ठिकाणी याची लक्षणे आढळतात. दातांमध्ये, नाकातून सायनसमध्ये नंतर डोळ्यांमध्ये आणि नंतर मेंदूमध्ये हा विकार आढळून येतो. यात दात हे प्रथम लक्ष्य असते. दातांना यामुळे प्रचंड वेदना होऊ शकतात, असे प्रतिपादन डॉ. निखाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यास नाक बंद होते. तो सायनसमध्ये जास्त पसरल्यास डोळ्याने अंधुक दिसू लागते. आणि नंतर याचा संसर्ग मेंदूमध्ये झाल्यास फिट्स येतात. काळ्या बुरशीला आवर घालण्यासाठी रुग्णालयांनी रोज रुग्णाची रक्तशर्करा चाचणी करावी. रुग्णालयातून सुटी झाल्यावरही आहाराचे काही नियम पाळणे रुग्णाला जरुरी असल्याचे ते म्हणाले. मातीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना या बुरशीचा धोका जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात काम करताना शेतकऱ्यांनी मास्क, हातमोजे घालणे गरजेचे आहे, असे डॉ. निखाडे यांनी नमूद केले आहे. ******

No comments:

Post a Comment