Thursday 27 May 2021

खबरदारीतून परतवून लावू तिसरी लाट - डॉ. प्रकाश देव

सर्वेक्षणासाठी पंचसुत्रीचा अवलंब करा नागपूर, दि.27: कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षांपासून देशावर घोंघावत आहे. नागरिकांनी एकत्र लढा देत, संयमाने आतापर्यंत दोनदा कोरोनाची लाट परतवून लावली आहे. तिसरी लाट येणार असे सांगण्यात येत आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी एकत्रपणे संयमातून खबरदारी घेतल्यास तिसरी लाटही आपण परतवून लावू, असा ठाम विश्वास इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. प्रकाश देव यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाची तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. देव बोलत होते. डॉ. देव यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करण्यापूर्वी बोलताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, दुसरी लाट नागपूर जिल्ह्याने परतवून लावली. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सत्र जिल्हा प्रशासनाने आयोजित केले आहे. त्याचा नागपूरकरांना निश्चितच फायदा होईल. चुकीच्या नव्हे, योग्य माहितीवर विश्वास ठेवा कोरोना झाल्यानंतर काही लोक नशिबाला दोष देत बसतात. अनेकदा काही जण विविध माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीला, एमएसएम, व्हिडीओला बळी पडतात. असे न करता डॉक्टर, अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून जी अधिकृत माहिती येईल, त्यावरच विश्वास ठेवा, असे आवाहन डॉ. देव यांनी केले. प्रशासकीय यंत्रणेने जसा हिवताप (मलेरीया) नष्ट केला, अगदी त्याचप्रमाणे कोरोनाशी युद्ध करायचे आहेत. यात दोन प्रकारची जबाबदारी आरोग्य सेवकांवर येणार आहे. आशा, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आदींनी यासाठी घरोघरी जाऊन (अॅक्टिव्ह) सर्वेक्षण करावे, असे आवाहन डॉ.प्रकाश देव यांनी केले. सर्वेक्षणाची पंचसूत्री v आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक व्यक्तीची घरोघरी तपासणी करावी. v संबंधित व्यक्तींच्या संपूर्ण माहितीचा डाटा सुसज्ज ठेवावा. v संशयित रुग्ण असल्यास तो कुठून आला, त्याला ताप वगैरे किती आहे, याच्या नोंदी ठेवाव्यात. v संशयित व्यक्तीला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, फुप्फुसाचे आजार आहे का, याची माहिती घ्यावी. v रॅपीड अॅण्टीजेन टेस्ट, आरटी-पीसीआर चाचणी करावी. योग्य उपचार करी, तो रुग्णाला तारी आरोग्य सेवकांनी कोरोनाबाधितावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधिताचे विलगीकरण करणे सर्वांत आधी गरजेचे आहे. रुग्णाला 99 फॅरनहिट ताप असेल, पल्स ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी 94-95 असेल, दम लागत नसेल तर अशा रुग्णांना घरीच पॅरासिटामॉल देऊन बरे करता येऊ शकते. अशा रुग्णांनी स्वत:च्या मनाने इतर कोणतीही औषधे घेऊ नये. फक्त विलगीकरणात राहत योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा. सत्राचा समारोप करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, कोरोनाबद्दल योग्य माहिती कमी आणि अफवा अधिक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम पसरत आहे. हा संभ्रम नागरिकांनी दूर करावा. कोणत्याही माहितीची योग्य यंत्रणेकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन डॉ.प्रकाश देव यांनी केले आहे. ग्रामस्थांनी घ्यावा पुढाकार v गावागावात आता कोरोना शोध पथके स्थापन करणे गरजेचे झाले आहे. v गावात नवीन व्यक्ती आल्यास त्याचे 17 दिवस विलगीकरण करणे गरजेचे आहे. v पथके तयार करण्यासाठी गावातील तरुणाईने पुढाकार घ्यावा. v प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. v रुग्णालयांची यादी, सेवांची माहिती अद्ययावत ठेवावी. ग्रामीण भागात कोरोना विरुध्द लढण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. माझे गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावांमध्ये स्पर्धा सुरु झाल्याचे श्री. कुंभेजकर यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment