Friday 7 May 2021

लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी विभागीय टास्क फोर्सची निर्मिती - डॉ. संजीव कुमार

• एम्समध्ये 200 खाटांचे अद्ययावत मुलांचे कोविड सेंटर • तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी • बालकांसाठी व्हेंटीलेटर, एनआयसीयू • उपचारासाठी खासगी डॉक्टरसह परिचारिकांना प्रशिक्षण • मुलांचे फिवर क्लिनिक तात्काळ सुरु करणार नागपूर दि.07 लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण वाढत असल्याचे निदर्शनास येत असून तिस-या लाटेमध्ये मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूरसह विभागीय स्तरावरील उपचाराचा प्रोटोकॉल तसेच प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. लहान मुलांची काळजी व उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे दिली. कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दल दिलेल्या पूर्वसूचना लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी तात्काळ उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे 200 खाटांचे लहान मुलांसाठी आयसीयू व एनआयसीयू असलेले सुसज्ज कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त यांनी आज दिली. कोरोनाच्या तिस-या लाटेची पूर्वसूचना व लहान मुलांमधील कोरोना संसर्ग हाताळण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्सबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनरेगा आयुक्त अंकीत गोयल, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशूंडी, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. प्रकाश देव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, एम्सचे डॉ. मनिष श्रीगिरीवार, डॉ. दिप्ती जैन, डॉ. विनिता जैन, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. रवींद्र सावरकर, डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. रवी शंकर धकाते, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. राजेश गोसावी, डॉ. राम दुधे, डॉ. ओम धावडे उपस्थित होते. तिस-या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण आढळून आल्यास त्यावर तात्काळ उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यपद्धती निश्चित करणे, खासगी व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना प्रशिक्षण व प्रभावी उपचारासाठी निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. विनिता जैन, डॉ. उदय बोधनकर, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. दिप्ती जैन एम्सच्या डॉ. मिनाक्षी गिरीश आदींचा समावेश करण्यात आला आहे. लहान मुलांमधील कोरोना उपचार करताना शून्य ते 18 वर्षे वयोगटाचे प्रमाण सरासरी 4 ते 6 टक्के आहे. मुलांमध्ये तीन प्रकारचा कोरोना होण्याची शक्यता आहे. यासाठी फिवर क्लिनिक तात्काळ सुरु करुन उपचाराबद्दलची माहिती देण्यात येईल. नागपूर विभागात या लाटेची शक्यता लक्षात घेऊन साधारणत: आयसीयू आणि एनआयसीयू बेड कसे सज्ज ठेवता येतील, यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच बालकांवर उपचार करणारे खासगी हॉस्पिटल यांचाही समावेश करण्यात येऊन त्यांनाही उपचाराबाबत प्रशिक्षण देण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांनी यावेळी चर्चा केली. नागपूर विभागात दुसऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना करताना कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक उपचारासह आयसीयू बेड, व्हेंटीलेटर तसेच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागपूरसह विभागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, लहान मुलांसाठी व्हेंटीलेटर तसेच मुलांसाठी ऑक्सिजनची सुविधा नव्याने निर्माण करावी लागणार आहे. ही सुविधा निर्माण करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांची खरेदी, मुलांसाठी आवश्यक असलेले औषध तसेच प्रशिक्षण व उपचार यावर येणाऱ्या खर्चासंदर्भातही टास्क फोर्सने अहवाल तयार करुन सादर करावा, असे निर्देश यावेळी दिलेत. कोरोना उपचारासाठी रेमिडिसीवीर या इंजेक्शनबाबत खासगी रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. वस्तुत: रेमिडीसीवीर वापरण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार सर्वांनीच याचा मर्यादित वापर करावा. त्याबरोबरच लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन अशा प्रकारच्या औषधांचा काळाबाजार होणार नाही. या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या सदस्यांनी विविध सूचना केल्यात. ******

No comments:

Post a Comment