Friday 28 May 2021

कोरोना प्रतिबंधाचे अनोखे वझ्झर मॉडेल !

नागपूर, दि.28 : कोरोनामुळे बाधित झालेल्या नागरिकांची संख्या पहिल्या लाटेपासून वाढत असतानाच वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहातील 123 बालकांना कोरोनाची लागण झालेली नाही. कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतानाच त्यांच्या विशेष संगोपणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे ही संपूर्ण बालके कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले आहे. बालगृहातील एकाही मुलाला कोरोनाची लागण होऊ नये ही अतिशय वैशिष्टयपूर्ण अशी बाब ठरली आहे. स्वर्गीय अंबादासपंत दिव्यांग बेवारस बालगृहाच्या माध्यमातून मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथे ज्येष्ठ समाज सुधारक शंकरबाबा पापडकर अंध, अपंग व मतिमंद असलेल्या 123 मुलांचा सांभाळ करीत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे गावे बाधित झाली असताना वझ्झर येथे बालगृह त्यापासून मुक्त राहिले आहे. एकमेकांच्या मदतीशिवाय ज्या मुलांचा सांभाळ शक्य नाही, अशा मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी शंकरबाबांची धडपड निश्चितच गौरवास्पद आहे. अनाथ मतिमंद बालकांचा सांभाळ करताना त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त ठेवण्याची किमया या बालगृहात पाडल्यामुळे एकाच छताखाली एकत्र राहूनही मागील दीड वर्षापासून एकाही मुलाला ताप अथवा सर्दी झाली नाही. त्याच महत्वाच कारण म्हणजे स्वच्छतेला दिलेले प्राधान्य. 123 मुलापैकी 98 मुली एकत्र राहतात. मतिमंद असल्यामुळे अनेक मुलांना जेवणसुध्दा भरवावे लागते. अशा परिस्थितीतही बालकांमध्ये विश्वास जागृत करण्याचे काम सातत्याने केले जाते. मुलांनी जगविली 15 हजार झाडे बेवारस असलेल्या मतिमंद तसेच अंध व अपंग मुलांनी बालगृहाच्या परिसरात विविध प्रजातीची 15 हजार झाडे लावली आहेत. या वृक्षांचा सांभाळ करण्याची जबाबदारी बालकांनी स्वीकारली आहे. त्यामुळे 200 पेक्षा जास्त प्रजाती असलेल्या झाडांची वनराई निर्माण झाली आहे. यामध्ये 5 हजार कडुलिंबाची झाडे असून आता बहारदार वनराई फुलल्यामुळे प्रसन्न व आरोग्यदायी वातावरण निर्माण झाल्याचे शंकरबाबा पापडकर यांनी सांगितले. कोरोनासंदर्भात मागील 21 मार्च रोजी पहिल्यांदा टाळेबंदी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून बालगृहामध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. आरोग्य पथकाच्या तपासणी व्यतिरिक्त कुणालाही या परिसरात प्रवेश नाही. कडुलिंबाचा निर्जंतुकीकरणासाठी वापर करताना औषध म्हणूनही याचा वापर केला जात आहे. बालसुधारगृहातील सर्व 123 बालकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यात यश आले असतानाच येथील मुलांना कोरोनावरील लस मिळावी यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नेवाल यांना विनंती केली आहे. या बालगृहात 18 वर्ष व त्याहून अधिक वयाचे असलेल्यांना लस मिळावी हा शंकरबाबांचा आग्रह आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या प्रचलित नियमानुसार बालगृहात मुलांना प्रवेश नसल्यामुळे अशा मुलांच्या भविष्यातील संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शासनाच्या प्रचलित कायदयामध्ये बदल करुन मतिमंद मुलांचे आजीवन पुनर्वसन व्हावे असा आग्रह शंकरबाबा पापडकर सातत्याने धरत आहेत. ******

No comments:

Post a Comment