Wednesday 2 June 2021

नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या -डॉ. संजीव कुमार

* मान्सूनपूर्व तयारीचा आढावा * एसडीआरएफची पथके तैनात * सिंचन प्रकल्पांची स्ट्रक्चरल ऑडिट हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यामुळे विभागातील नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित तसेच पिकांची व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या तयारीचा आढावा डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीत भारतीय सेनादलाचे कर्नल बढिये, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर लक्ष्मण के. राव, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडर पंकज डहाणे, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवार, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्रीकांत फडके, विकास उपायुक्त अंकुश केदार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, पोलीस उपायुक्त राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. सिंचन प्रकल्पामधून पुराचे पाणी सोडताना नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त म्हणाले की, मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेली गावे तसेच पूर नियंत्रण रेषेनुसार बाधित होणाऱ्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून विभागात मॉक ड्रिल आयोजित करावी यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा उपस्थित राहील याबाबत खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्हा तसेच तालुकास्तरावरील नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहतील तसेच या नियंत्रण कक्षामध्ये आवश्यक माहितीसह तात्काळ प्रतिसाद मिळेल याची खबरदारी घेण्यात यावी. आंतरराज्य वाहणाऱ्या नद्यासंदर्भात पावसाची तसेच पुराच्या माहितीचे आदान-प्रदान करावे. जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत आपत्ती निवारणासाठीचे सर्व साहित्य सुस्थितीत असून तात्काळ वापर करणे शक्य आहे यादृष्टीने प्रमाणित करुन त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे मान्सून कालावधीत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोविड-19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी घ्यावी. शेतपीक, फळपीक नुकसानीसंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पुरामुळे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तयार करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यास अशा कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध होईल यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करावे. आदी सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्तीच्या बैठकीत तात्काळ उपाययोजनेच्यासंदर्भात विभागामध्ये समन्वय ठेवावा. तसेच कर्मचाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी एसडीआरतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. हवाई दलातर्फे पूर परिस्थिती बाधित कुटुंबांना अन्नाचे पाकिटे वितरित करताना ती सुस्थितीत राहतील यादृष्टीने जिल्हास्तरावर खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुराचे पाणी सोडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांना आवश्यक पूर्वसूचना मिळाल्यास यंत्रणा सज्ज ठेवता येईल. बाधित गावांमध्ये भारतीय सेनेतर्फे मदत पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे समन्वय असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी आदी सूचना यावेळी विविध विभागाकडून करण्यात आल्या. *****

No comments:

Post a Comment