Wednesday 30 June 2021

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप गुरुवार, दिनांक 1 जुलै कृषीदिनी होणार आहे. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या कृषी संजीवनी मोहिमेचा राज्यस्तरीय कार्यक्रमात समारोप होणार असून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कृषी सह संचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे राबतविण्यात आली आहे. जिल्ह्यात या सप्ताहात आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन 1 जुलैला कृषी विभागामार्फत वर्ष 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहे. उद्या मंत्रालयात होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये या राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चॅनल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM वरुन होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. 00000

No comments:

Post a Comment