Thursday 24 June 2021

सर्व_सिटी_सर्वे_ऑनलाईन_होणार -जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू

जिल्ह्यात कामठी येथे ई-पीक पायलट प्रोजेक्ट
सर्व सिटी सर्वे कार्यालय ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड, सातबारा, शहरातल्या फेरफारची नकलसुद्धा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना मिळणार असून विनाकारण कार्यालयात येणाची गरज भासणार नाही, असे जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख संचालक एन. के. सुधांशू यांनी सांगितले. नागपूर विभागाच्या दौऱ्यावर जमाबंदी आयुक्त आले असताना रवी भवन येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी निशीकांत सुके, उपसंचालक भूमी अभिलेख बाळासाहेब काळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गजानन डाबेराव यावेळी उपस्थित होते. ई-पीक डिजिटल सेवांची माहिती देतांना सुधांशू म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे. माहिती अचूक राहिल्यास शासनास शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देणे सोयीचे होणार आहे. त्याबरोबरच वित्तीय संस्थांना शेतकऱ्यास कर्ज देतांना त्रास होणार नाही. या सेवेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अपडेट माहितीमुळे अचूक सातबारा शेतकऱ्यास मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कामठी येथे प्रथमच प्रायोगिक तत्वावर ई-पीकचा पायलट प्रोजेक्ट करण्यात आला आहे. याचा फायदा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना सुद्धा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी सांगितले. नागरिक स्वत:ही माहिती डिजिटल पद्धतीने भरु शकतो. नागरिकांनी (डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन) digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अचूक माहिती भरावी व सेवेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी भूमि अभिलेख विभागातील नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते व राहूल काटकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जमाबंदी आयुक्त श्री. सुधांशू यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला. 00000

No comments:

Post a Comment