Saturday 5 June 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम अंतीम टप्प्यात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली पाहणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर हे जागतिक दर्जाचे नागपूरातील एक वैभव होईल. ऑगस्टपर्यंत कन्व्हेंशन सेंटरचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामाला गती द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले. कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या बांधकामाची पालकमंत्री डॉ. राऊत यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक दर्जाच्या या वास्तूचे बांधकाम अंतीम टप्प्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन येत्या काही महिन्यात करण्याचा मानस असल्याने या बांधकामाला गती देण्यात यावी. तसेच कन्व्हेंशन सेंटरमध्ये कार्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, नासुप्रच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, प्रकल्प वास्तुशिल्पकार संदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर हा 113 कोटींचा प्रकल्प असून केवळ उत्तर नागपूरमधील नव्हे तर मध्य भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थासाठी हे उत्कृष्ट केंद्र ठरणार आहे. या केंद्रात बँकिंग, तसेच राष्ट्रीय दर्जाचे रेस्टॉरंट, ऑडिटोरीयम, बिझनेस सेंटर, ग्रंथालय, आर्ट गॅलरी आदी स्थापन करण्यात येणार आहेत. आगामी नियोजनात पार्कींग सुव्यवस्थेवर भर देण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुगत नगर येथे ‘अशोक’ वृक्ष लावून वृक्षारोपण केले. तसेच कल्पनानगर येथील धम्मप्रिय बौद्ध विहार बगीचा येथेही वृक्षारोपण केले. त्यांनी येथील ग्रीन जीमची पाहणी केली. नगरसेविका नेहा निकोसे तसेच नागरीक यावेळी उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment