Wednesday 28 July 2021

राष्ट्रीय लोक अदालत 1 ऑगस्टला

नागपूर, दि. 28 : राज्यात एकाच वेळी उच्च न्यायालय व त्यांची खंडपीठे, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायधीकरण व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी 1 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्यामार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा सर्व संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा व राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्देश पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. सी. मोरे तसेच सचिव अभिजित देशमुख यांनी केले आहे. लोक अदालत आयोजित करण्यामागचा उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्त्वाची प्रकरणे लोक न्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचे निवारण करणे आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रलंबित प्रकरणामधून योग्य प्रकरणांची छाननी करुन आपसी समझोत्यासाठी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 30 हजार प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. या लोक अदालतीमध्ये कोर्टातील खालील प्रकारची प्रकरणे विविध स्थानी आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, पराक्राम्य दस्तावेज अधिनियमाच्या कलम 138 ची प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे(कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायद्याची प्रकरणे), भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (चोरीची) प्रकरणे, नोकरी संबंधी प्रकरणे ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे-भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे आणि दूरध्वनी प्रकरणे आदींचा समावेश राहणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर अभिजित देशमुख यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment