Saturday 24 July 2021

पर्यावरणाचे संतुलन राखून शाश्वत विकास व्हावा - विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर दि.24 - भविष्यातील गरजा लक्षात घेवून नैसर्गिक संसाधनाचा वापर सुयोग्य रितीने करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत नागरिकरणाच्या प्रक्रियेचा विचार करतांना शाश्वत विकास व पर्यावरणाचे संतुलन यांचा समन्वय साधावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. ‘पर्यावरण व वने’ या विषयावर वनराई फाऊंडेशनमार्फत आज एक दिवसीय कार्यशाळा शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुलातील देव संवाद कक्षात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. यावेळी वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, प्रधान मुख्य वनसरंक्षक ( वन्यजीव ) सुनील लिमये, पेंच वनक्षेत्राचे मुख्य वनसरंक्षक डॉ. रवी गोवेकर, निसर्ग प्रेमी ॲङ फिरदोस मिर्झा,नीरी वायू प्रदुषण नियंत्रण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉ. के. व्ही. जॉर्ज, नीरी संसाधन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉ. नितीन लाभशेटवार आदी यावेळी उपस्थित होते. पर्यावरणाच्या शाश्वत विकासाबाबत श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, आज माणूस प्रचंड प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतू ही प्रगती करतांना निसर्गाचे संतुलन ढळणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गचक्रामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे महापूर ,दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. अशा आपत्तीग्रस्त कुटुंबियांचे पर्यायी स्थलांतर करणे सोपी बाब नाही. पर्यावरण संवर्धनासाठी लोकांचा सहभाग तसेच श्रमदान गरजेचे आहे. ‘मी आणि माझा परिसर’ येथील पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी माझ्यावर आहे, हा विचार प्रत्येकाने अंगी बाळगून कृती करणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी, विजेचा अनावश्यक वापर, प्लास्टीकचा अमर्यादित वापर, अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले विश्व जवळ येत आहे तसे क्लिष्टही होत आहे. आपण जे करतो त्याचा परिणाम इतरांवर होतो. यासाठी प्रत्येकानेच पर्यावरणाविषयी संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रशासनातर्फे पर्यावरण संवर्धनासाठी विविध योजना राबविल्या जातात. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोविड -19च्या साथीमुळे आयुष्य जगण्यासाठी फार कमी गरजा आवश्यक असल्याचे सर्वांनाच जाणवले आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पर्यावरण संवर्धनासाठी ‘सुयोग्य नियोजन’ ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगून श्री. गांधी म्हणाले, काही भागात दुष्काळ तर काही भागात महापूर अशी परिस्थिती निर्माण होते. यासाठी पावसाचे पाणी वाहून न जावू देता ते जमिनीत जिरविणे गरजेचे आहे .तसेच दिवसेंदिवस नदीच्या पात्रांची रुंदी वाढत आहे परंतु खोली कमी होत आहे. यामुळे नदीला पूर आल्यास वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण वाढत आहे. जमिनीची धूप थांबविणे गरजेचे आहे.जमिनीचा एक इंच जाडीचा थर तयार होण्यासाठी खूप वर्षे लागतात. ही धूप थांबविण्यासाठी पावसाळ्यात मोकळया जागा, टेकडया, दऱ्या अशा ठिकाणांवर फळांच्या बिया फेकाव्यात. काही बिया रुजतात व नवीन रोपे तयार होतात. या अशा साध्या प्रयोगानेही आपण वृक्षारोपण करुन वनराई निर्माण करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकेत श्री. वटे यांनी जागतिक पर्यावरणाचे प्रश्न व उपाय यासबंधी माहिती दिली. जैवविविधेतेचे नुकसान, जलसंसाधनाचा अपुरा साठा, अन्न सुरक्षा, जीवाष्म इंधनाचे विक्षेपण, वेगाने वाढणारा ऊर्जा वापर, शहर आणि पर्यावरण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत श्री. सुनील लिमये यांनी ‘वनांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण व त्याचा प्रसार’ ,ॲङ मिर्झा यांनी ‘पर्यावरण संवर्धनात लोकसहभागाचे महत्त्व’, डॉ. के.व्ही.जॉर्ज यांनी ‘नागपूर शहरातील वायू गुणवत्ता स्थिती व्यवस्थापन’ ,डॉ. लाभशेटवार यांनी ‘हरित वायू उत्सर्जन व नियंत्रण’ यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन वनराई फाऊंडेशनचे समन्वयक नितीन जतकर तर सचिव निलेश खांडेकर यांनी आभार मानले. ******

No comments:

Post a Comment