Thursday 15 July 2021

आर्थिक व सामाजिक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याला प्राधान्य - रवींद्र ठाकरे

आदिवासी विकास अपर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला नागपूर, दि. 15 : अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना तसेच विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या प्रत्यक्ष लाभाच्या योजना पोहचविण्यासोबतच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाला प्राधान्य राहणार असल्याचे नागपूर विभागाचे नवनियुक्त आदिवासी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. अमरावती रोडवरील आदिवासी विकास भवन येथे अपर आयुक्त म्हणून श्री. ठाकरे यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. यावेळी आदिवासी विकास उपायुक्त दशरथ कुळमेथे, सहायक आयुक्त नयन कांबळे व विलास सावळे उपस्थित होते. नागपूर विभागातील आदिवासी अपर आयुक्त म्हणून रवींद्र ठाकरे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. यापूर्वी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रवींद्र ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर राज्यात कोरोनामुळे उद् भवलेल्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी पहिल्या व दुसऱ्या लाटेत केलेल्या कामामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिव्हिर व त्यानंतर म्युकरमायकोसिसची परिस्थितीसुद्धा कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळली आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी रवींद्र ठाकरे यांनी पुढाकार घेवून सुरु केलेल्या दूध संकलनामध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून विदर्भातील शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले असून दररोज मदर डेअरीच्या माध्यमातून दोन लाख लिटरपेक्षा जास्त दुधाचे संकलन होत असून पहिल्यांदाच विदर्भातील मुंबई व दिल्लीसाठी दूध पाठविण्याला सुरुवात झाली आहे. शेतकरी बचत गट तसेच शेतकऱ्यांच्या कंपन्यांची स्थापना करुन संत्र्यासह विविध फळे व भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन दिले आहे. वनामतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणालाही रवींद्र ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. आदिवासी विकास विभागातही रोजगारासह प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी मानस असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. *****

No comments:

Post a Comment