Wednesday 18 August 2021

मिशन लसीकरण अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी हस्तांतरण

• लसीकरण मोहिमेस मिळणार गती • महापारेषणच्या ‘सीएसआर’ निधीमधून खरेदी • विदर्भ सहायता सोसायटीचे योगदान • नागपूर व अमरावती विभागांना मिळणार लसीकरण वाहने नागपूर दि.18: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागपूर व अमरावती विभागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी तर्फे सामाजिक दायित्व अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी होत आहे. विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन लसीकरण’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी राहणार असून राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कोरोना सुरक्षेचा एकच विकल्प, ‘मिशन लसीकरण हा संकल्प’ या अभियानाचा शुभारंभ सद्भावना दिनी म्हणजेच 20 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ‘प्रत्येक घराची वारी, लसीकरण तुमच्या दारी’ यानुसार नागपूर व अमरावती विभागात विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील अकरा जिल्ह्यातील 120 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लसीकरण वाहनांचा हस्तांतरण सोहळा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गोंदियाचे नबाब मलिक, भंडाऱ्याचे डॉ.विश्वजित कदम, वर्धेचे सुनिल केदार, चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार, अमरावतीच्या यशोमती ठाकूर, अकोल्याचे ओमप्रकाश (बच्चू) कडू, बुलढाण्याचे डॉ.राजेंद्र शिंगणे, यवतमाळचे संदीपान भुमरे, वाशिमचे शंभुराजे देसाई, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण वाहनांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कोविड नियमानुसार ऑनलाईन तथा ऑफलाईन पद्धतीने या सोहळ्यात मान्यवर सहभागी होणार आहेत. नागपूर व अमरावती विभागात 15 ऑगस्टपर्यंत 94 लाख 14 हजार 820 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 72 लाख 81 हजार 665 तर दुसरा डोस 24 लाख 53 हजार 440 नागरिकांनी घेतला आहे. नागपूर व अमरावती विभागात लसीकरणाचे उदिष्ट्य पूर्ण करण्यासाठी मिशन लसीकरण ही मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तिला लस मिळावी किंबहुना जे रुग्ण बेडवरुन ऊठू शकत नाही अशांना लस देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी दोनशे लसीकरण वाहने प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. लसीकरणासोबतच जेष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया तसेच आकस्मि‍क आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय चमूस रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून विदर्भ सहायता सोसायटीमार्फत वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. मिशन लसीकरण या मोहिमेंतर्गत अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस घेवून आपले आरोग्य सुरक्षित करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत तसेच विदर्भ सहायता सोसायटीच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा तसेच अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment