Wednesday 11 August 2021

समाजात अवयवदानाबाबत व्यापक प्रबोधन गरजेचे - श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा

अवयवदान जागृती सप्ताहाचे उद्घाटन नागपूर, दि.11: अवयवदानाबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन त्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासोबतच अवयवदान सप्ताह हा उपक्रम केवळ एका आठवड्यापुरता मर्यादित न राहता हा उपक्रम वर्षभर राबवावा, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, विभागीय आयुक्त कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (नागपूर विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षा वैशाली खंडाईत, सचिव डॉ. सचिन गाथे आदी यावेळी उपस्थित होते. अवयवदान हा संवेदनशील विषय असला तरी समाजाच्या पुढाकाराने कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे सांगत श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, समाज हा नेहमी सहकार्याच्या भूमिकेत असतो. त्यांना केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कोविडच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. याचप्रमाणे अवयवदानासंदर्भातही नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व जनमाणसांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. नागपूर शहर हे मध्य भारतातील मोठे ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित होत आहे. येथे शासकीय तसेच खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात आहेत. अतिदक्षता कक्ष असणाऱ्या रुग्णालयांत अवयवदानाबद्दलची माहिती व त्याचे महत्त्व, अवयवदान करावयाचे असल्यास संबंधित यंत्रणेच्या संपर्क क्रमांकाची तपशीलवार माहिती दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. रुग्ण ब्रेन डेड असल्यास त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन करुन अवयवदान करता येणे शक्य आहे. कोविड काळामध्ये ग्रामीण भागात आशा वर्कर्सने महत्त्चाचे योगदान दिले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांचा काम करणाऱ्याचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. याच धर्तीवर अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समन्वयक म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांचे कार्य उल्लेखनीय आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करतांना तसेच अवयवदान करतांना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांना माहिती असते. तेव्हा अशा समन्वयकांचे अनुभव लक्षात घेवून हे अभियान राबविल्यास चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. संचालक हेमराज बागुल म्हणाले, सर्वच गोष्टी शासन निर्णयाने होत नाहीत. काही गोष्टी समाज निर्णयाने होतात. यासाठी समाजात आवश्यक त्या जाणिवा पेरण्याची जबाबदारी सर्वांची आहे. समाज आदर्शवादी तसेच अनुकरणशील आहे. चांगल्या गोष्टीचे निश्चितच अनुकरण केले जाते. जगण्यानंतरचा खरा विचार अवयवदान हाच आहे. या जाणिवा समाजात रुजाव्या यासाठी व्यक्तिगत स्तरापासून ते समुहस्तरापर्यंत सर्व पातळ्यांवर पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोविडनंतरच्या काळात असे उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अवयवदानाची गरज व पूर्तता याबाबत बोलतांना श्रीमती दाणी म्हणाल्या, भारतात जेवढ्या रुग्णांना अवयवांची गरज आहे, त्यातील फक्त चार टक्के रुग्णांनाच अवयव मिळतात. 96 टक्के रुग्ण अवयव न मिळाल्यामुळे मृत्यूमुखी पडतात. ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी गरजेचे आहे. एका ब्रेन डेड रुग्णामुळे आठ रुग्णांना जीवनदान मिळू शकते. मुत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुध्दीकरण (डायलेसिस) हा पर्याय आहे. परंतू यकृत, हृदय, फुप्फूस, स्वादूपिंड अशा विकारानी त्रस्त रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाचा मार्ग उपलब्ध आहे. अवयवदानाबद्दल जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. देशात फक्त सहा राज्यात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येतात. नागपूर शहर मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे. यामुळे येथे अवयव प्रत्यारोपण संस्था स्थापन करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. शहरात अवयव प्रत्यारोपणाची पंधरा केंद्र आहेत. एका ब्रेन डेड व्यक्तीचे बहूतांशी अवयव दान करता येवू शकते. या अवयवदानातून मोठ्या प्रमाणावर जीवनदानाची मोहिम उभारली जावू शकते, असा विश्वास डॉ. देवतळे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी अवयवदान प्रत्यारोपण समन्वयक म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांना तसेच शहरातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या रक्तपेढींना यावेळी मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुषमा ठाकरे यांनी तर आभार डॉ. सचिन गाथे यांनी मानले. ******

No comments:

Post a Comment