Monday 6 September 2021

नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर कडक निर्बंध लावणार - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 6 :गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आढावा बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर व कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोविडसोबतच डेंग्यूसंदर्भातही आढावा घेण्यात आला. सध्या शहरामध्ये डेंग्यूची रुग्णवाढ होत असून त्याचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञाकडून केले गेले. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेवून सध्या मेडिकलमध्ये दोनशे खाटा कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरापर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची उपलब्धता करण्यात आली आहे. असा आढावा विविध विभागामार्फत सादर करण्यात आला. या बैठकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने आवश्यकता नसताना घराबाहेर पडत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे. असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली. सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ****

No comments:

Post a Comment