Wednesday 26 January 2022

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार





सैन्य, पोलीस, आरोग्य, क्रीडा, प्रशासनातील उपलब्धीचे कौतुक

          नागपूर, दि.26 : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे साजरा झाला. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झेंडावंदन, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व त्यांचे भाषण झाल्यावर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सैन्य, पोलीस, आरोग्य, क्रीडा, प्रशासनातील उपलब्धीचे कौतुक करण्यात आले.

          जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके यांनी देशाकरिता दाखवलेल्या अदम्य साहस, कर्तव्यपरायणता व बलिदानाकरिता त्यांच्या पश्चात वीरपत्नी राजश्री मंगेश रामटेके यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ६० लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. शहीद मंगेश हरिदास रामटेके यांच्या वीरमाता विजया हरिदास रामटेके व विरपिता हरिदास धोंडूजी रामटेके यांना प्रत्येकी २०-२० लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्रांच्या हस्ते हा सत्कार वीरपुत्राला जिल्ह्याची श्रद्धांजली होय.

          नागपूर जिल्ह्याने कमी वेळामध्ये ध्वजदिन निधीचे अती उत्कृष्ठ संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी आर विमला व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांचा सैनिक कल्याण विभाग पुणे तर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जलतरणपटू जयंत प्रकाश दुबळे व सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी ज्ञानेश्वर गजभिये या जिल्हा युवा पुरस्काराच्या मानकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

          नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या श्वान पथकात कार्यरत असलेले रवींद्र अशोकराव टोंग यांना अॅथलेटिक्ससाठी जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून टोंग नागपूरच्या खेळाडूंना अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण देतात व त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाळु घडविलेत. अभिषेक प्रमोद सेलोकर व उर्वशी अनिल सनेश्वर यांची सॉफ्ट बॉल तर मृणाली प्रकाश पांडे यांची बुद्धिबळासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पालकमंत्र्यांनी सर्व जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थींचा दहा हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

          कायाकल्प योजनेअंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून देण्यात योगदानाबाबत डागा स्मृती शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ सिमा पारवेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी थोरात, अ. जि.शल्य चिकित्सक डॉ. संध्या डांगे, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनिता जैन व वैद्यकीय अधिकारी प्रा. अ. केंद्र धापेवाडा डॉ. प्रमोद रेवाडे यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट व आशा हॉस्पिटल या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य राखीव पोलीस बल गट क्र ४ नागपूरचे असिस्टंट कमांडेन्ट प्रमोद हरिराम लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतूल, सहाय्यक फौजदार सुरेश मुरलीधर वानखेडे यांची गुणवत्तापूर्ण सेवा अंतर्गत राष्ट्रपती यांच्या पोलीस शौर्य पदकासाठी निवड झाली आहे, पालकमंत्र्यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

35 वर्षांपासून कार्यक्रमाचे संचलन

          डॉ. दीपक साळीवकर यांचा आवाज दरवर्षी कस्तुरचंद पार्कच्या प्रजासत्ताक सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्यांना चांगला ओळखीचा आहे. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ.साळीवकर गेल्या ३५ वर्षांपासून या सोहळ्याचे संचलन व समालोचन करतात. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या या व्यासंगात खंड पडला नाही. यावर्षीही कस्तुरचंद पार्क व साळीवकरांचे समालोचन ही जुगलबंदी अव्याहत सुरु होती.         

 

No comments:

Post a Comment