Tuesday 8 February 2022

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ वर विकासकामांची माहिती

· द्विवर्षपूर्तीनिमित्त विशेष उपक्रम नागपूर, दि. 8 : राज्य शासनाने दोन वर्षात केलेली विविध विकासकामे आणि योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी पाच विशेष गाड्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर–गोंदिया ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ वरही आकर्षक पद्धतीने योजनांची माहिती देण्यात आली आहे. या गाडीचे आज दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यांसह योजनांची माहिती देण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर अभ्‌यासक्रम आणि डाटा सेंटर सुरु केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उजळणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासन प्राधान्य देत असून, विद्युत बस सेवेत वाढ होणार आहे. परिणामी राज्यातील प्रदूषणाला आळा बसणार आहे. राज्य शासनाने मुंबईतील ‘आरे’ जंगलामध्ये वृक्षांसाठी 808 एकर क्षेत्र आरक्षित झाले असून वनसंपदेचे रक्षण झाल्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. समृद्ध शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असून, गतवर्षी चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी या योजनांनाही येथे प्राधान्य देण्यात आले आहे. सोबतच युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य, वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण आदींची माहिती देण्‍यासोबतच ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्यामुळे आश्वासक नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच कोकणातील समुद्रकिनारे, येथील पर्यटन वाढीस राज्य शासन चालना देत असून, येथे देश - विदेशातून पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवेचा प्रारंभ झाल्याचाही उल्लेख आहे. राज्यात शेती, क्रीडा, सामाजिक इत्यादी क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू केले आहेत. दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विविध विकासकामे केली आहेत. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी दि. 1. फेब्रुवारी ते दि. 2 मार्चदरम्यान एक महिना हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. अजनी, नागपूर मुख्य रेल्वेस्थानकावर आणि पुढे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ही विशेष रेल्वेगाडी संदेश पोहचविणार आहे. कोल्हापूर ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेवर दिलेल्या विविध योजना, विकासकामांच्या आदीं संदेशाचे कौतुक केले. *****

No comments:

Post a Comment