Friday 13 May 2022

पशुधन विकास योजनेत 2 हजार 242 लाभार्थी राज्यातील पहिली अभिनव योजना

·         कौशल्य विकासांतर्गत दूध व शेळीपालन

·         2 हजार 242 लाभार्थ्यांची निवड

·         1 हजार 400 शेतकऱ्यांना गाय व शेळी गटाचे वाटप

 

नागपूर, दि. 13 : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील अभिनव अशा प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेत कौशल्य विकासांतर्गत दूध व शेळीपालन प्रकल्प राबविण्यात येत असून या अंतर्गत 2 हजार 242 लाभार्थ्यांनी नव्वद टक्के अनुदानावर शेळी व गायीचे गट उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 1 हजार 403 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गायी व शेळी वितरित करण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेत कौशल्य विकास अंतर्गत दुग्धविकास तसेच शेळीपालनाची योजना तयार करण्यात आली आहे. दुग्धपालन गटामध्ये दोन देशी  गायी  किंवा म्हैस याचा समावेश आहे. तसेच शेळीपालन योजनेमध्ये दहा शेळ्या व एक बोकड नव्वद टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यातील खनिज क्षेत्रातील खनीकर्मद्वारे अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष बाधित गावातील लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. लाभार्थ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेळीपालन योजनेंतर्गत ग्रामीण भागात उच्च दर्जाची प्राणिजन्य प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे याची उपलब्धता करुन देण्यासोबतच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे. योजनेसाठी सर्वसाधारण व इतर मागासवर्ग संवर्गातील लाभार्थ्यांना  प्राधान्य राहणार आहे. त्यासोबत दिव्यांग तसेच महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.

शेळीगट योजनेंतर्गत जिल्ह्यातील तालुकानिहाय 1 हजार 75 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून यापैकी 571 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष शेळी वाटप करण्यात आल्या. यामध्ये विम्याचा सुद्धा समावेश आहे.

दुग्धविकास योजनेंर्गत दुधाळ जनावरांच्या  माध्यमातून दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देणे तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मदत व्हावी या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून आठ ते दहा लिटर दूध देणाऱ्या देशी साहीवाल, गीर, डांगी, हरियाणा आदी गायींचा समावेश आहे. संपूर्ण जनावरांची खरेदी ई-निविदेद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 हजार 167 लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली असून आतापर्यंत 832 लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन गायींचे वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये दोन गायींची किंमत 1 लाख 20 हजार विमा रक्कम 5 हजार 760 अशी एकूण 1 लाख 25 हजार 760 रुपयांची योजना असून नव्वद टक्के 12 हजार 576 रुपये लाभार्थी हिस्सा म्हणून भरावयाचा आहे. ही संपूर्ण योजना राज्याचे पशु व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पशुधन विकासासोबतच रोजगराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.

*****

No comments:

Post a Comment