Friday 8 September 2023

पथविक्रेत्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी 50 हजार पर्यंतच्या कर्ज योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करा विभागीय आयुक्तांच्या नगरपालिकांना सूचना

नागपूर दि. 7 : कोविड काळात टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांची बाधीत झालेली उपजीविका पुन्हा सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथ विक्रेत्यांना १० हजार ते ५० हजार रुपये पर्यंतच्या कर्ज पुरवठा योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. नगरपरिषद प्रशासनाचे विभागीय सहआयुक्त मनोजकुमार शहा, सहायक आयुक्त संघमित्रा ढोके तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींचे अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (नागरी) अंमलबजावणीत गती आणण्याचे तसेच नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये सर्व शासकीय योजना पूर्ण क्षमतेने राबविण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले. पी.एम. स्व-निधी योजना, प्रधानमंत्री गती शक्ती योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), अमृत -2 अभियान, इंटेग्रेटेड वेब बेस्ड पोर्टल, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांचा आढावा श्रीमती बिदरी यांनी घेतला व योजनेंतर्गत दिलेले उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पी.एम.स्वनिधी योजनेंतर्गत www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून प्राप्त अर्जानुसार प्रथम टप्प्यात देय होणारे रुपये १० हजार कर्ज विभागातील ५२ हजार ८५८ पथविक्रेत्यांना, दुसऱ्या टप्प्यातील २० हजाराचे कर्ज १२ हजार २५७ पथविक्रेत्यांना व तीसऱ्या टप्प्यात देय होणारे ५० हजार रुपयांचे कर्ज १२६३ पथविक्रेत्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती मनोजकुमार शाह यांनी बैठकीत दिली. बैठकीला नगरपालिका प्रशासन विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते. 00000

No comments:

Post a Comment