Wednesday 6 September 2023

गणेशोस्तव शांततेत, उत्साहात साजरा करा प्रशासनाचे जनतेला आवाहन

 पोलीस ,स्थानिक प्रशासनाची गणेशमंडळासोबत बैठक  गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या  मनपाकडून मूर्ती स्वीकार केंद्र
 पर्यावरणपूरक गणेशोत्सव आयोजनाला प्रोत्साहन  उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन नागपूर, दि.६ : पर्यावरणपूरक,शिस्तीत व उत्साहात गणेशोस्तव साजरा करण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आज पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले. महापालिकेकडून गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच, विसर्जनस्थळी मूर्ती स्वीकार केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरित्या येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात गणेशमंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली. यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्यासह पोलीस, मनपा व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवा दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण न होता कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सहकार्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेश मंडळांनी वर्गणीसाठी नागरिकांना जबरदस्ती करु नये, पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी शॉर्ट सर्कीट होणार नाही याची दक्षता घ्यावी, सीसीटिव्ही लावावेत,आपत्तीजनक देखावे उभारु नये आदी सूचना त्यांनी दिल्या. ‘गणेश विसर्जन’ आणि ‘ईद’ उत्सव हे 28 सप्टेंबर रोजी साजरे होणार आहेत, हे लक्षात घेता सामाजिक सौहार्द राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक वापरण्यासंदर्भातील सूचना तसेच विसर्जनासाठी शहरात उभारण्यात आलेले कृत्रिम तलाव, मार्ग याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती अमितेश कुमार यांनी दिली. शहरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती डॉ. अभि्जित चौधरी यांनी दिली. मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमुर्त्यांची स्थापना व्हावी तसेच विसर्जनासाठी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी मनपातर्फे झोनस्तरावर मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रांवर गणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणुकीप्रसंगी नागरिकांनी स्वयं शिस्त पाळण्याचे आवाहनही श्री. चौधरी यांनी केले. महानगरपालिकेने प्रथमच गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी व या कार्यपध्दतीत सुसूत्रता आणण्याकरिता ऑनलाईन परवनगी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत आचल गोयल यांनी सादरीकरण केले व सविस्तर माहिती दिली. यापूर्वी एक खिडकी योजनेद्वारे गणेश मंडळांना परवानगी देण्यात येत असे. मनपाने पोर्टलद्वारे ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने 48 तासात संबंधीत विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होऊन अंतिम परवानगी देण्यात येणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती गोयल यांनी केले. गणेश मंडळांना मनपातर्फे आकारण्यात येणारे विविध शुल्क माफ करण्यात आले असून सफाई व प्रवेशद्वार शुल्कच मंडळांना द्यावे लागणार असल्याची माहितीही श्रीमती गोयल यांनी दिली. राज्यात देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्काराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ विपीन इटनकर यांनी दिली. राज्यातून पहिल्या तीन पुरस्कारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील गणेश मंडळ पुरस्कार पटकावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यस्तरावर या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गणेश मंडळाला रुपये 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2.5 लाख आणि तृतिय क्रमांकास 1 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर निवड समिती नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यातून एकूण 41 उत्कृष्ट गणेश मंडळांची निवड करुन त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेतील सहभागासह गणेश मंडळांनी पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता निवडणूक प्रक्रिया व जनतेच्या सहभागाबाबत जनजागृती करणारे देखावे उभारण्याचे आवाहनही डॉ. इटनकर यांनी केले. यावेळी उपस्थित गणेश मंडळ व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अडचणी मांडल्या व प्रशासनातर्फे त्याचे निराकरण करण्यात आले. मनपा उपायुक्त सुरेश बगळे यांनी प्रास्ताविक केले तर जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. 000

No comments:

Post a Comment