Thursday 26 October 2023

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा - विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर, दि. 26 : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.छेरिंग दोरजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशनी तेलगेाटे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय माहुरकर, दुरदृश्य प्रणालीव्दारे नागपूर विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहायक आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय अभियोक्ता यांची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त बिदरी यांनी मागील प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला, यामध्ये बलात्कार, विनयभंग, मारहाण तसेच गंभीर दुखापत यासारख्या प्रकरणांचा तपास तात्काळ पूर्ण करून चार्टशिट सादर करावी तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांची माहिती घेवून प्रकरणे तातडीने निकाली काढावी असे निर्देश यावेळी दिलेत. अनुसूचित जाती जमाती अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्यासाठी समाजकल्याण विभागाने जनजागृती करावी याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या प्रशिक्षणांमध्ये कायद्याविषयी माहितीचा समावेश असावा. अॅट्रॉसिटी कार्यशाळेचे आयोजन करुन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अत्याचारग्रस्ताना व इतर लाभार्थ्यांना अंत्योदय योजना, संजय गांधी निराधार योजनांचा लाभ देण्यात यावा असे यावेळी सांगण्यात आले. 00000

No comments:

Post a Comment