Wednesday 11 October 2023

झोपडपट्टी वासियांना येत्या डिसेंबर पर्यंत पट्टेवाटप करा - देवेंद्र फडणवीस

अनधिकृत भुखंडधारकांना नियमितीकरणासाठी विशेष मोहीम 18 भुखंडधारकांना नियमितीकरण पत्र 360 झोपडपट्टी धारकांना पट्टेवाटप
नागपूर, दि.9 : शहरातील झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टेपाटप येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. श्री फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी शासकीय निवासस्थानी अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण पत्र व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते आज 18 भुखंडाचे नियमितीकरणपत्र व 11 झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरुपात पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी उपस्थित होते. नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमीत क्षेत्र नियमानुकुल करुन त्यांना स्थायी पट्टे वाटप करण्यासाठी महानगरपालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागातर्फे संयुक्त मोहीम राबवून पट्टे वाटपाच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या. महानगरपालिका क्षेत्रात 426 झोपडपट्टया असून त्यापैकी 298 घोषित तर 128 अघोषित आहेत. सुधार प्रन्यास तर्फे 360 झोपडपट्टी वासियांना घरकुल पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे. मिश्र जागेवर असलेल्या 200 झोपडपट्यांचे सर्वेक्षण शासनाच्या भूमापन विभागाने स्थानिक मोजणी करुन तत्काळ संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. झोपडपट्टी धारकांकडील जागेबद्दलचे सर्वेक्षण महापालिकेकडून करण्यात येत असून त्यापैकी 281 झोपडपट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 60 झोपडपट्यांचे सर्वेक्षण सुरु असून सुधार प्रन्यासच्या जागेवर 85 झोपडपट्या आहेत. तसेच, नझूल व महसूल जागेवर 72 झोपडपट्टयांपैकी 61 झोपडपट्ट्यांमध्ये 16 हजार 65 अतिक्रमणधारक आहेत. विशेष मोहिमेद्वारे ‘घरपोच नियमितीकरण पत्र’ अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधार प्रन्यासला दिल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 200 अनधिकृत भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र पोस्टाव्दारे घरपोच पाठविण्यात येणार आहे. आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र देण्यात आले. नियमितीकरणासाठी सुधार प्रन्यास तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र गुंठेवारी सुधारित अधिनियमानुसार 1 हजार 200 भूखंडाचे नियमितीकरण पत्र सुधार प्रन्यास तर्फे घरपोच वितरीत करण्यात येत असल्याची माहिती सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांनी यावेळी दिली. 000000

No comments:

Post a Comment