Wednesday 8 November 2023

पेंच व्याघ्र प्रकल्पात विदेशी पर्यटकांसाठी आरक्षित कोटा -विजयलक्ष्मी बिदरी ·

स्थानिक सल्लागार समितीची बैठक · जल पर्यटनाला प्रोत्साहन नागपूर,दि.7 : पेंच व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात भेट देवून पर्यटनांचा निर्भेड आनंद घेता यावा, तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी ८५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. विदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पर्यटकांसाठी आरक्षित कोटा ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त तथा स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्रीमती बिदरी बोलत होत्या. आमदार ॲड. आशिष जास्वाल, वनरक्षक तथा क्षेत्र संचालक, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सचिव डॉ.प्रभू नाथ शुक्ल, तसेच समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पेंच व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच या प्रकल्पाच्या सभोवतालच्या क्षेत्रात पर्यटन सुविधा निर्माण करतांना स्थानिक जनतेच्या उपजिवीकेचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे पर्यटन गेट मधील पर्यटन संख्या वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. खुर्सापार गेटवरुन पर्यटनासाठी पसंती आहे, त्यामुळे पश्चिम पेंच व खुर्सापार गेट जोडण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवेगाव खैरी ते किरंगीसर्रा या २५ किलोमीटर लांबीपर्यंत बोट पर्यटन सुरु करण्यात येणार आहे. तसेच पूर्ण दिवस सफारीचा आनंद घेता येईल. यादृष्टीने सुविधा निर्माण करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तुंचे विक्रीकेंद्र प्रकल्पाच्या गेटवर सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यासोबत पेंच व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक समिती, बचत गटांच्या यांना पर्यटकांना गावातच सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक अनुदान देण्यात येणार आहे. तसेच प्लॅास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अंबाखोरी येथे असलेल्या धबधब्या पर्यंत पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करतांना बोटद्वारे पर्यटनाला चालना देणे, पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघासह इतर वन्य प्राण्यांच्या अधिवासासंदर्भात पर्यटकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देणे, तसेच पर्यटनासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्यावरही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रारंभी डॉ.प्रभू नाथ शुक्ल यांनी सर्व सदस्यांचे स्वागत करुन पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. 0000000

No comments:

Post a Comment