Thursday, 14 December 2023
आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतराची तक्रार आल्यास तत्काळ कारवाई - मंत्री मंगलप्रभात लोढा
नागपूर, दि. 14 : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याच्या तक्रारी आल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी विधानपरिषदेत सांगितले.
आदिवासी व्यक्तीच्या धर्मांतरांच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी सूचना निरंजन डावखरे यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते. ते म्हणाले की, आदिवासी समाजाने आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करून जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशावेळी वेगवेगळी प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मपरिवर्तन केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल. या समितीत सर्व राजकीय पक्षांचे (विधानसभा/विधानपरिषद) प्रतिनिधी आणि आदिवासी समाजातील दोन व्यक्तींचा समावेश असेल. ही समिती 45 दिवसांच्या आत शासनाला अहवाल सादर करेल, असे श्री. लोढा यांनी सभागृहात सांगितले.
या लक्षवेधी सूचनेच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, राजहंस सिंह, कपिल पाटील यांनी सहभाग घेतला होता.
००००
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment