Tuesday 19 December 2023

शेतमालाचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास अधिक नफा - श्रीमती मुक्ता कोकड्डे

 



 

·        नागरिकांनी शेतमाल खरेदी करण्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांचे आवाहन

·        जिल्हा कृषी महोत्सव व धान्य महोत्सवाचे उदघाटन

·         शेतमालाची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री  

·        शनिवारपर्यंत चालणार महोत्सव

 

नागपूर, दि. 19: शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतमालाचे मूल्यवर्धन करावे. मूल्यसंवर्धित शेतमालाची विक्री केल्यास चांगला भाव मिळून अधिकचा नफा पदरी पडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मुक्ता कोकड्डे यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, कृषी विभागांतर्गत येथील कृषी महाविद्यालय वस्तीगृह परिसरात जिल्हा कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन श्रीमती कोकड्डे यांच्या हस्ते करण्यात आले.   

          कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम तसेच स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देऊन सर्व स्टॉलला भेट दिली. नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवामध्ये सहभागी होऊन कृषी मालाची खरेदी करावी, असे आवाहन अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांनी केले.

याप्रसंगी पुणे येथील ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, कृषी आयुक्तालयाचे संचालक रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र मनोहरे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, प्रकल्प उपसंचालक श्रीमती पल्लवी तलमले, ‘स्मार्ट’चे नोडल अधिकारी अरविंद उपरीकर आदी उपस्थित होते.

नागपूर येथे कृषी महाविद्यालय परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सव शनिवार, (दि.23)पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. नागपूर विभागातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेला नैसर्गिक व उच्च प्रतीचा शेतमाल नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागपूर तसेच संपूर्ण विदर्भातून 200 शेतकरी गट, उत्पादक कंपन्या व शेतकरी कृषी महोत्सवात सहभागी  झाले असून, यामध्ये  सेंद्रिय भाजीपाला, तांदूळ, कडधान्य, तृणधान्य, फळे व महिला गटांनी तयार केलेले चवदार पदार्थ उपलब्ध  आहेत. तसेच  तांत्रिक दालनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे, द्रोन, शेती उपयोगी यंत्र, सेंद्रिय शेतीचे दालन इत्यादी ठेवण्यात आले आहे.

शनिवार, (दि.23)पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिली असून, नागपूरकर नागरिकांनी शेतकऱ्यांनी पिकविलेला आणि शेतमालावर प्रक्रिया केलेल्या मालाची ‘शेतकरी ते थेट ग्राहक’मधून खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

******


No comments:

Post a Comment