Wednesday 31 January 2024

ध्येयप्राप्तीसाठी आत्मविश्वास महत्वाचा - डॉ.सिध्दार्थ गायकवाड



 

•सामाजिक न्याय विभागाच्या स्पंदन युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

 

नागपूर,दि. 30 :  आजचा काळ हा आर्टिफिशयल इंटेलिजेंसचा आहे. त्यामुळे भविष्यातील आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चीती करावी. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय आणि आत्मविश्वास अंगी असणे आवश्यक आहे. सातत्य आणि वेळेचे नियोजन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विशेष सहाय्य  विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.

            सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने ‘स्पंदन युवा सांस्कृतिक महोत्सवाचे’  आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त मंगेश वानखेडे, शासकीय निवासी शाळेच्या विशेष अधिकारी अंजली चिंवडे, गृहपाल किशोर रहाटे यांची उपस्थिती होती.

            पुढे बोलताना श्री. गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने स्पंदन युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना नवीन प्लॅटफार्म निर्माण करून दिला. जिल्हास्तरावर झालेला सांस्कृतिक महोत्सव लवकरच विभागस्तरावर आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी  घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.  विद्यार्थ्यांनी ग्रंथसंपदेसोबतच महापुरूषांच्या जीवन चरित्राचे वाचन करावे. या महोत्सवामध्ये २६ शासकीय वसतिगृह आणि 3निवासी शाळा सहभागी झाल्या आहे.

 

नवीन वेबसाईटचे लोकार्पण

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने   WWW.acswnagpur.in या वेबसाईटचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकेशिनी तेलगोटे यांनी केले तर आभार अंजली चिंवडे यांनी मानले.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment