विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसिलदारांना दुरदृष्यप्रणालीद्वारे
दिले निर्देश
नागपूर, दि. 14 : नागपूर विभागातील घरकुल
योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता कमाल 5 ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध
करून देण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांना केल्या आहेत.
श्री. बावनकुळे यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय
आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसिलदारांची बैठक
घेतली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासह
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व
तहसिलदार यावेळी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, महसूल
व वने विभागाच्या दिनांक 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत हद्दीमधील
वाळू स्थळातून वाळू उत्खनाकरिता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून अनूमती प्राप्त वाळू
गटांपैकी जे वाळूगट लिलावामध्ये गेले नाहीत अशा वाळू गटातून शासनाच्या विविध घरकुल
योजनांतर्गत पात्र लाभर्थ्यांकरिता स्वामित्वधन न आकारता कमाल 5 ब्रास पर्यंत वाळू
उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
याची विभागात चोख अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व तहसिलदारांनी येत्या
15 दिवसात स्थानिक आमदारांसोबत तसेच संबंधित
जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसोबत बैठक घेवून पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध
करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
तहसिलदारांना जवळचा वाळूगट नमूद करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना अर्जाविनाही
ऑनलाईन पास उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्यासाठी लाभार्थी तहसिलदारांकडून उपलब्ध ऑनलाईन
पासेस डाऊनलोड करून संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत
15 दिवसांच्या आत घरकूल लाभार्थ्यांना घरपोच उपलब्ध करून नोंद घेण्याचे शासन निर्देश
आहे. स्वामित्वधन रकमेपेक्षा (रू 600 प्रती ब्रास) कमी नसणारे शुल्क आकारून वाळू पुरवठा
घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून द्यायची आहे. यानुसार नागपूर विभागात तातडीने व चोख अंमलबजावणी
करण्याच्या सूचनाही श्री. बावनकुळे यांनी केल्या.
0000
No comments:
Post a Comment