Monday, 30 June 2025

सामान्य जनता व देशाला सर्वोच्च प्राधान्य - सरन्यायाधीश भूषण गवई

 

 

हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश यांचा भावपूर्ण सत्कार

 नागपूर, दि. २८ :  हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे देशाच्या सरन्यायाधीश या सर्वोच्च पदावर नियुक्त झाल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी समृतीचिन्ह व पूष्पगुच्छ देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कवी सुरेश भट सभागृहात आयोजित या भावपूर्ण सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता होते तर व्यासपीठावर श्रीमती तेजस्वीनीताई गवई, मातोश्री श्रीमती कमलताई गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, भारताचे महाअधिवक्ता तुषार मेहता, महाराष्ट्राचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव ॲड. अतुल जलतारे यावेळी उपस्थित होते.

हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे होत असलेला गौरव अत्यंत भावपूर्ण असल्याचे सांगतांना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शानुसार काम करण्याचा सातत्याने प्रयत्न राहीला आहे. सामान्य व गरीबांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. वडीलांच्या सूचनेनुसार या क्षेत्रात आलो असून आईच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला आकार मिळाला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवितांना कुणाचेही नुकसान होणार नाही या वडीलांच्या शिकवणीच्या आधारावरच मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

वकील व न्यायमूर्ती ही दोन्ही पदे समाजाच्या सेवेसाठी आहे. मला मिळालेली संधी ही सामान्य जनता यांच्यासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळीत व न्यायमूर्ती संजीव खन्ना आदर्श आहे. नागपूर बार असोसिएशनमध्ये माजी सरन्यायाधीश भाऊसाहेब बोबडे व वी.आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनानुसार वकिलीला सुरुवात केली. याच काळात शासकीय अभियोक्ता म्हणून वैद्यकीय प्रवेश, वन विभागामुळे जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी करावयाच्या प्रश्नासंदर्भात भूमिका मांडून प्रश्न सुटू शकला याचे समाधान असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, झुडपी जंगालामुळे हजारो नागरिकांचा प्रलंबित प्रश्न सोडविणे शक्य झाले.

वेगवेगळया प्रकरणात निकाल देतांना सामाजिक व आर्थिक प्रकरणांची सोडवणूक करण्याची संधी मिळाली असून  गोंदिया, चंद्रपूर या भागात वैद्यकीय महाविद्यालय, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी मदत आदी विविध सामाजिक प्रश्नाचे सोडवणूक करणे शक्य झाले. न्यायपालिकेतील न्यायमूर्ती व इतर अधिकाऱ्यांच्या वेतन व पेंशनचा प्रश्न तसेच वन रँक वन पेंशन आदी प्रश्नांचे सोडवणूक करतांना न्यायदानामध्ये पारदर्शकता आणण्यालाही प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हायकोर्ट बार असोसिएशनचा सदस्य म्हणून केलेल्या उपक्रमासंदर्भात यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई गौरवपूर्ण उल्लेख केला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेले निकाल अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्यामुळे प्रत्येक निकालामध्ये स्पष्टता आहे. या क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी व सकारात्मकता यामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्याचा गौरव करतांना ते खरे अर्थाने भूषण आहे. सामान्य जनतेला सूलभपणे न्याय मिळावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. तसेच न्याय व्यवस्थेतील विविध सुधारणा संदर्भात विविध सूचना केल्यात.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, भारताचे महाअधिवक्ता तुषार मेहता, महाराष्ट्राचे महाअधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, अधिवक्ता फिरदोस मिर्झा, एस.के. मिश्रा, आनंद जयस्वाल, ज्येष्ठ अधिवक्ता सुनिल मनोहर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी केले. यावेळी विविध संस्था व संघटनांच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला.

*****


'मित्र' राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल... येत्या पाच वर्षात 'जीएसडीपी' 35 लाख कोटींवर नेण्याचे ध्येय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


'महास्ट्राइड' उपक्रमाचा शुभारंभ

 नागपूर, दि. २८ : शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू यात शंका नाही. या दृष्टीने अधिक विचार करून आपण 100 दिवस प्रशासकीय सुधारणा उपक्रम, त्यापाठोपाठ 150 दिवस उपक्रम हाती घेतले. आज ज्याचा प्रतिनिधिक शुभारंभ केला तो महास्ट्राइड हा उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मिहान येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या अर्थात आयआयएम सभागृहात महा स्ट्राइड प्रकल्पाचा प्रातिनिधिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,  मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर,  उपाध्यक्ष राणा जगजीत सिंग पाटील, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मा. मंत्री मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे मारचीन पियाट्‌कॉस्की आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


संस्थात्मक विकास कामांचे नियोजन हे प्रदीर्घ काळ चालणाऱ्या निरंतर प्रक्रियेचा भाग असतो, तो पाया असतो. सरकारकडे संस्था, इन्स्टिट्युशन म्हणून पाहताना विकासाचे दीर्घाकाल केलेले नियोजन हे अंमलबजावणी यंत्रणेतील माणसे बदलली तरी त्याची गती ही स्वयंचलित पद्धतीने पुढे सरकायला हवी. यातूनच दीर्घ नियोजनाला अर्थ उरेल व विकासाचे उद्दिष्ट आपण साध्य करू. या दृष्टीने विचार करून आपण महा स्ट्राईड प्रकल्पाचा शुभारंभ केला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 2013 - 14 पर्यंत आपला जो जीएसडीपी होता तो 15 लाख कोटी पर्यंत पोहोचला. 2013 - 14 पासून ते 2019 - 20 पर्यंत तो 29 लाख कोटी पर्यंत पोहोचला. गेल्या पाच वर्षाचा जर विचार केला तर तो 45 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या विकासाकडे आपण अभ्यासपूर्ण दृष्टीने जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की गत दहा वर्षात आपण 30 लाख कोटी रुपयांची वाढ साध्य केल्याचे निदर्शनास येते. याचा अर्थ महाराष्ट्राकडे विकासाची प्रचंड क्षमता असल्याचे स्पष्ट होते असे ते म्हणाले. विकासाच्या या टप्प्यामध्ये अजून एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. या एकूण 45 लाख कोटी जीएसडीपी मध्ये केवळ सात जिल्हे 50 टक्क्यांपर्यंत जीएसडीपी तयार करतात असे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारताचे तसेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे विकासाच्या प्रक्रियेत योगदान गरजेचे आहे. राज्याच्या जीएसडीपीच्या वाढीमध्ये आपण कुठे आहोत हे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहून आपल्या जिल्ह्याचे काय योगदान राहील याचा विचार केला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्याजवळ निधीची कमतरता नाही गरज आहे ती सुयोग्य डाटावर आधारित नियोजनाची. ज्या योजना परिपूर्ण आहेत त्या योजनांवर खर्च होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाची भूमिका ही सहकार्याची, शक्ती देण्याची आहे असा विश्वास खाजगी क्षेत्राला प्रशासनाकडून मिळायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या प्रशासनात उत्तम क्षमता आहे, त्या क्षमतेला ओळखून सर्व जिल्हाधिकारी न्याय देतील हा प्रकल्प यशस्वी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मित्र या संस्थेच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. नव्या महाराष्ट्राची उभारणी 'मित्र'च्या माध्यमातून होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्र ही संस्था महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा हा एक मोठा विकास रथ होऊ शकते.  ही चळवळ होऊ शकते. विकसित भारताचे  स्वप्न साकार करण्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राला उचलायचा असून मित्रच्या माध्यमातून महाराष्ट्राची उभारणी होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विकासामध्ये सर्वसमावेशकता असली पाहिजे. जिल्हा आणि तालुके हे विकासाची केंद्र होण्याची गरज असून सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाला यातून अधिक गतिमान होता येईल. मित्रच्या माध्यमातून मागास जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

विभागनिहाय जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राज्याच्या सहा विभागातील प्रत्येकी एका जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. यात नागपूर विभागातून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, अमरावती विभागातून वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., संभाजीनगर विभातून धाराशिव जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, नाशिक विभागातून जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कोकण विभागातून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यांचे सादरीकरण केले.

*****


वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार - सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 


            नागपूर, दि. 28: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज दिलेत.

               डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ याच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचा आढावा घेण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी नागपूर विभागातील सर्व उपायुक्त व संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.

बहुतांश वसतिगृहाची क्षमता ही केवळ शंभर विद्यार्थी क्षमता असलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ घेता येत नाही त्याकरीता नवीन वसतिगृहाची निर्मिती ही कमीत कमी दिडशे ते दोनशे व जास्तीत जास्त हजार विद्यार्थी क्षमता असलेले निर्माण करा. वसतिगृह महाविद्यालयाच्या जवळपास निर्माण करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे निर्देश समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

            समाज कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेतांना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वसतिगृहाचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक गतीमान करा. जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी तत्परतेने कार्य करा. प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्य करतांना आपल्या विभागाविषयी व आपल्या कार्याविषयी चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

            महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये असे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांनी दिले.  समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000


बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात नागरी सहकारी बँकांची भूमिका महत्वाची - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

                            वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा रौप्य महोत्सव उत्साहात

         नागपूर दि.२८ : नागरी सहकारी बँकांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र व गुजरात राज्यात असून या बँकांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यातही नागरी सहकारी बँकांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

येथील वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार सागर मेघे, पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्वल पगारिया, वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, उपाध्यक्ष अश्विन शहा व्यासपीठावर उपस्थित होते.


बहुतांशी व्यावसायिक बँका गुंतवणुकीसह इतर बाबींमध्ये अग्रेसर असतात परंतु  देशाच्या आर्थिक विकासासाठी विविध प्राधान्यशील क्षेत्रात (प्रायॉरिटी सेक्टर) करण्यात येणाऱ्या कर्जपुरवठ्यात त्या मागे असतात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, वर्धमान बँक स्थापनेपासूनच विविध निर्देशांक आणि मानकांच्या कसोटीवर उत्कृष्ट कार्य पार पाडत आहे. विशेषतः प्राधान्यशील क्षेत्रात प्रमाणावर कर्ज वाटप करूनही शून्य टक्के एनपीए असणाऱ्या  व सातत्याने 15 टक्के लाभांश देणाऱ्या या बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वित्तीय संस्थांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, जास्तीत जास्त वित्तीय संस्था स्थापित झालेल्या प्रदेशाची आर्थिक आणि भौतिक प्रगती जोमाने होते. या संस्था प्रगतीच्या मानक आणि विकासाच्या भागीदार ठरतात. या दृष्टीने वर्धमान बँकेने व्यावसायिकता जोपासतानाच कौशल्यपूर्ण कामकाजातून व्यावहारिकता सांभाळत चांगली वित्तीय व्यवस्था उभी केली. कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून बँकेचीही प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकिंग क्षेत्रात यापूर्वी मोठे बदल झाले तसेच काही नवी धोरणेही लागू झाली. मात्र अशा परिस्थितीतही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून सहकारी बँकांनी व्यावसायिकतेचा अवलंब करत नवीन परिस्थितीत स्वतःला स्थापित केले. व्यावसायिक व राष्ट्रीय बँकांनादेखील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी निर्माण झालेले तंत्रज्ञान स्वीकारण्यास अवधी लागला. मात्र त्या सर्व बाबी अर्बन बँकांनी गतीने स्वीकारून ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी सर्व सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. वर्धमान बँक केवळ बँकिंग क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी पार पाडत असल्याचे ते म्हणाले.

श्री.फडणवीस यांनी वर्धमान बँकेच्या स्थापनेबाबतची आठवण यावेळी विषद केली. 1999 मध्ये वर्धमान बँकेची स्थापना झाली व त्याच वर्षी ते विधानसभेत निवडून आले. बँकेची कारकीर्द आणि आपला विधिमंडळातील प्रवास या दोन्ही बाबींचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याचे सांगताना या संस्मरणीय घटनेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. वर्धमान म्हणजे वर्धिष्णू होणे किंवा समृद्ध होत जाणे. या बँकेच्या संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांची अचूक निर्णय क्षमता व त्यांनी दाखवलेल्या व्यावसायिक कौशल्यामुळे हे नाव सार्थक झाले असल्याचे ते म्हणाले. बँकेची तत्व व व्यावहारिक निकषांचे पालन करत इतर सहकारी बँकाही उत्कृष्ट कामगिरी करून योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात वर्धमान बँकेने अधिकाधिक उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

डॉ. पंकज भोयर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनामध्ये स्वतंत्र सहकार विभागाची निर्मिती केली ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचे सांगितले. वर्धा व नागपूर या जिल्हा बँकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून पुनरुज्जीवन झाल्याने मोठी मदत झाल्याचे ते म्हणाले. राज्य सहकारी बँकेने ग्राहकांची सायबर क्राईमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी स्थापन केलेल्या केंद्राच्या मदतीने राज्यातील इतर जिल्हा बँकांनाही या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून सहकारातून समृद्धी साधल्या जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी खासदार अजय संचेती यांनी उत्तम व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बँकेने केलेल्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे संचालक अनिल पारख यांनी बँकिंग संबंधातील सर्व सुविधा ग्राहकांना वेळोवेळी पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. बँकेच्या विविध शाखांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

माजी आमदार सागर मेघे, उज्वल पगारिया यांनी बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा प्रवास व संक्षिप्त परिचय चित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. बँकेला प्रगतीपथावर नेण्यात विशेष योगदान देणारे संचालक मंडळातील विविध पदाधिकारी व सदस्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी संचालक मंडळातील अतुल कोटेचा, दिलीप रांका, राजन धाड्डा, हितेश संकलेचा, हेमंत लोढा, आशिष दोशी उपस्थित होते.

*****


संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण .... संविधानाच्या उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क एक महत्वाचे पाऊल  

- सरन्यायाधीश भूषण गवई

           संविधान उद्देशिका पार्कद्वारे संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 नागपूर, दि.28 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कुल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी आणि या समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारतीय संविधानाचे धडे गिरविले व संवैधानिक मूल्य कृतीमध्ये आणले त्याच महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्कचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही अत्यंत महत्वाची व समाधानाची बाब आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या पार्कची कार्यपूर्ती होवून जनतेसाठी खुला होत आहे ही त्यातही महत्वाची बाब आहे. भारतीय संविधानाने सक्षम लोकशाहीची रचना करुन येथील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत अधिकार, समान संधीचा अधिकार व न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळेच संविधानातील मूल्यांवर चालत भारत देशाने जगात जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळविला आहे. उद्देशिका ही संविधानाचा गाभा आहे. यात निहीत मुल्यांचा सर्व नागरिकांनी अंगिकार करण्याची गरज आहे व संविधान उद्देशिका पार्कच्या माध्यमातून याची प्रेरणा येथे भेट देण्याऱ्या प्रत्येकाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येईल तसेच संविधान उद्देशिका पार्कला आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

  संविधान उद्देशिका पार्कच्या माध्यमातून एक महत्वाचे पाऊल - सरन्यायाधीश भूषण गवई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर शहरातच आपल्या आयुष्याच्या अंतिम काळात क्रांतीकारक धम्मप्रवर्तन केले. या क्रांतीकारक घटनेचे स्मरण कायम राहण्यासाठी व यातून प्रेरणा घेण्यासाठी दीक्षाभूमी स्मारकाची स्थापना झाली. भौगोलिकदृष्टया भारताचा मध्यबिंदू असलेल्या झिरो माईल येथे संविधान चौक निर्माण झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कुल ऑफ लॉ परिसरात संविधान उद्देशिका पार्क उभा राहिला आहे. ही वास्तूही येथे भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण व प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारण्याचा व त्यानंतर पहिल्याच नागपूर भेटीत संविधान उद्देशिका पार्कच्या उद्घाटनाचा योग आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या पार्कमध्ये लावण्यात आलेली भित्तीचित्रे, बाबासाहेबांचे मौलीक वाक्ये आदी बाबी उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेसह यात अंतर्भूत विविध महत्वाच्या मुल्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

                             संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संविधान उद्देशिका पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्याने आणि लोकसहभागातून ही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आली. या पार्कच्या माध्यमातून संविधानातील मौलिक विचार या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समस्त जनतेपर्यंत पोहचतील याचा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान व समाधान असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नागपूर विद्यापीठाने देशाला पंतप्रधानांसारख्या महान व्यक्ती दिल्या. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देशाला दिले. त्याच वास्तूमध्ये संविधान उद्देशिका पार्क उभे राहिल्याने या गौरवात वृध्दी झाल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. विद्यापिठाच्या ई-ग्रंथालयासाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या अर्थ सहाय्यासहीत अन्यबाबींचा परामर्श घेतला. तत्पूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी, न्या. भारती डांगरे,  न्या. वाय. जी. खोब्रागडे, न्या. वृषाली जोशी, न्या. श्रीमती एम. एस. जावरकर, न्या. नितीन बोरकर, न्या. आर. एन लढ्ढा, न्या. ए.एन पानसरे आदींचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी यांनी या वास्तूच्या निर्मितीतील विविध टप्प्यांची माहिती दिली. संविधान उद्देशिका पार्क समितीचे सदस्य पूरण मेश्राम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी आभार मानले.

असा आहे संविधान उद्देशिका पार्क

संविधान उद्देशिका पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान हातात धरलेली प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. उद्देशिका पार्कमध्ये संविधान उद्देशिकेतील भारतीय संविधान, आम्ही लोक, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आदी दहा मूल्यांचे भित्तिचित्रे (म्युरल्स) लावण्यात आली आहेत. उद्देशिका पार्कमध्ये लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ असलेले राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि अशोक स्तंभदेखील तयार करण्यात आला आहे. संपूर्ण संविधान प्रास्ताविका पार्क हा दोन एकर परिसरात साडेनऊ कोटी रुपये खर्चातून निर्माण करण्यात आला आहे. या पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले आहे.

*****


सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण - सरन्यायाधीश भूषण गवई

 

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जिल्हा न्यायालयात सत्कार

  नागपूर, दि 27 : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा वकील संघटना आणि उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे काम करतांना बऱ्याच गोष्टी आत्मसात करता आल्या, अशा भावना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे व्यक्त केल्या.

जिल्हा व सत्र न्यायालय येथे नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती अभय मंत्री आणि नागपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने देशाला महान वकील व न्यायाधीश दिले. जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे राहिले आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाद्वारे जनहित याचीकांचा प्रभावी उपयोग होवून जनहिताचे कार्य झाले. या तीनही संस्थांमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होताच विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवून यामाध्यमातून गोरगरीब आणि शेतकऱ्यांना न्याय देता आला. याचे समाधान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.         

                                                                                                          

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात घटना समितीच्या सदस्यांनी भारत देशाला अभूतपूर्व अशी राज्यघटना दिली. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूता या मुल्यांद्वारे राज्यघटना देशाला मार्गदर्शन करीत असून सामान्य व्यक्तीच्या अधिकाराचे रक्षण न्यायपालिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळतांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका कायम ठेवणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार सन 2001 मध्ये झोपडपट्टया काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात बजावलेल्या भूमिकेची आठवण सांगत हजारो झोपडपट्टी वासीयांचा निवारा वाचवू शकल्याच्या भावना त्यांनी मांडल्या. नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न केले व त्यास यश आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विधी क्षेत्रातील एकूण 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. विधी क्षेत्रातील वाटचाल व त्यातील विविध वळणांबाबत त्यांनी यावेळी मनमोकळे विचार मांडले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायुमूर्ती न्या.अतुल चांदूरकर, न्या.प्रसन्न वराळे, न्या. दीपांकर दत्तो आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे आणि जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती दिनेश सुराणा यांनी आपल्या संबोधनात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व व कार्यावर प्रकाश टाकला.

             नागपूर जिल्हा वकील संघटना आणि  विदर्भातील विविध विधी संघटनांच्या वतीने यावेळी न्या. गवई यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे  यांनी प्रास्ताविक केले तर सचिव मनिष रणदिवे यांनी आभार मानले.

    तत्पूर्वी, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि इमारतीच्या परिसरात तीन भाषांमधील संविधान उद्देशिकेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या हस्ते डिजिटल ग्रंथालयाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

00000


Friday, 27 June 2025

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात आगमन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाकडून स्वागत

 



नागपूर, दि. 27: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


 

सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर न्या. भूषण गवई यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (नक्षल विरोधी अभियान), विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबालकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधी क्षेत्र आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा 29 जून 2025 पर्यंत नागपुरात मुक्काम असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

0000

Monday, 23 June 2025

ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

  

      ‘मुख्यमंत्री चषक  राष्ट्रीय कुस्ती  अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

        नागपूर, दि.२१ : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिंपिक स्पर्धेत पहिले  पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीपटुंना पायाभूत सुविधा,प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात  येईल असे आश्वासन आज येथे दिले.

 भारतीय कुस्तीगीर महासंघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.त्यावेळी ते बोलत होते.गृह (ग्रामीण)राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संदीप जोशी, आमदार कृपाल तुमाने, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मागील काही वर्षात महाराष्ट्राने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याने गेल्या तीन वर्षात अव्वल कामगिरी केली आहे. कुस्तीतही १५ वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचा दबदबा आहे. मात्र, १५ वर्षावरील वयोगटात राज्याची कामगिरी सुधारण्याची गरज आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देत महाराष्ट्राला सन्मान मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर राज्यातील कुस्तीतून हा बहुमान मिळाला नाही. यापुढे  कुस्तीपटुंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरते मर्यादित नराहता ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी सर्व स्तरातून पोषक वातावरण होण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनही कस्तीपटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व पायाभूत सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.

कुस्ती हा प्राचीन क्रीडा प्रकार असून रामायण आणि महाभारतामध्येही कुस्तीचे संदर्भ आढळतात. महाराष्ट्राच्या खेडया-पाडयात कुस्ती आणि कबड्डी हा खेळ मोठया प्रमाणात खेळल्या जातो. कोल्हापूर,पुणे,सातारा,अमरावती,नागपूर आदी ठिकाणी कुस्तीचे आखाडे असून तिथेही कुस्ती खेळल्या जाते . आता लाल मातीवरील कुस्ती मॅटवर आली आहे. या खेळातील बदलानुसार खेळाडूंनीही कौशल्य आत्मसात करून उत्तमोत्तम प्रदर्शन करावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कुस्तीच्या सामन्यांचा आनंदही घेतला व विजेत्यांना पदक वितरीत केले. 

नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 मुख्यमंत्री राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी देशातील २५ राज्यांतून १५ वर्षांखालील स्पर्धक सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण १० वजन गट आहेत. मुलांसाठी ३८ ते ८५ किलो आणि मुलींसाठी ३३ ते ६६ किलो वजन गट आहेत.मुलांच्या फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन तर मुलींच्या फ्रीस्टाईल प्रकारात या स्पर्धा होत आहेत.  

००००००

 


जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार - महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 



पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’ 

         नागपूर, दि.२१ :  गेल्या वर्षभरात कामठी तालुक्यात अमलीपदार्थ विरोधी ३० मोठ्या कारवाया करून ६० लोकांना अटक करण्यात आली आहे. जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करत जनतेच्या  सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त  करू,असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

        नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन थंडर-२०२५ अंतर्गत कामठी येथील जयस्तंभ चौकात अमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, नागपूर पोलीस परिमंडळ -५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

         श्री. बावनकुळे म्हणाले,तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे एक छुपे युद्ध सुरू आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण हे व्यसन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. कामठी शहरातही तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणारे षडयंत्र सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने थंडर मोहीम सुरू केली आहे. जनतेने निडरपणे पोलीसांना अमलीपदार्थ विक्रेत्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

             येत्या काळात नागपूर शहर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत खापरा, जरीपटका हद्दीतील भागांचा समावेश असलेले नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात  येईल, येथील भाजीमंडी परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात येईल तसेच कामठी  शहर १०० टक्के सीसीटीव्ही सर्व्हेलन्सने सज्ज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

           पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ऑपरेश थंडर अंतर्गत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या विविध कारवायांद्वारे ८ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी  दिली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आभार मानले. 

 श्री. बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी जयस्तंभ चौक ते गोयल टॉकीज पर्यंत ‘अंमली पदार्थ विरोधी रॅली’ काढण्यात आली. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांनी जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

००००००


Tuesday, 17 June 2025

पीएमआवास (शहरी) योजनेच्या अंमलबजावणीबाबत विभागस्तरीय आढावा

 

नागपूर, दि. १७ : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमआवास शहरी) १.० व २.० बाबत विभागाची कामगिरी उंचावणे व योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विभागीय सह-आयुक्त संघमित्रा ढोके यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. पीएमआवास १.० मधील मंजूर प्रकल्पांची संपूर्ण अंमलबजावणी आणि पीएमआवास २.० अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीस मनपा आयुक्त चंद्रपूर, नागपूर यांचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता. (न.पा.प्र.) रामराज ठाकूर, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा सह आयुक्त व सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी तसेच शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (सीएलटिसी) उपस्थित होते.

  विभागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) १.० व २.०, पीएम गतिशक्ती नॅशनल प्लॅन फॉरमल्टी-मॉडल कनेक्टीविटी या महत्वाकांक्षी योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अमृत योजनेसह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

पीएमआवास योजना (शहरी) १.० चे बीएलसी घटकांतर्गत एकूण २९८१५ घरकुले पूर्ण झालेली असून १५,६९९ घरकुले प्रगतीपथावर आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे बीएलसी घटकांतर्गत एकूण १८,९२५ अर्ज प्राप्त झालेले पुढील मंजुरीचे कार्यवाहीकरिता प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पीएम आवास योजना (शहरी) १.० मधील मंजूर प्रकल्पांची १०० टक्के अंमलबजावणी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळणेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याबाबत यावेळी सूचना  देण्यात आल्या.

नागपूर विभागातील संपूर्ण महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे मुख्यधिकारी, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (सीएलटिसी) यांच्याकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्दिष्ट कमी आहे त्यांना तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करून उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत श्रीमती ढोके यांनी मार्गदर्शन करून तात्काळ १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याबाबत निर्देश दिले.

 प्रास्ताविक कार्यकारी अभियंता, (न.पा.प्र.) रामराज ठाकूर यांनी केले तर देवाजी सडमेक, (न.पा.प्र.) नागपूर यांनी उपस्थितांचे आभार मानले .

*******


नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत

 


मॅक्स एरोस्पेस आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

सुमारे 8000 कोटींची गुंतवणूक होणार, 2000 रोजगार निर्मिती 

मुंबई/नागपूर, दि. 13 - नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. श्री. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून त्याचे प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. 

हा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया आणि ‘आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला हा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.

या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र (सेन्टर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येणार आहे. यामुळे भारताच्या वाढत्या एरोस्पेस पुरवठा साखळीतही योगदान मिळणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मॅक्स एरोस्पेसने हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. मॅक्स एरोस्पेसच्या व्यवसायाच्या प्रवासात राज्य शासनही सहभागी आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपूरमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. कंपनीने आपले उत्पादनाचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करावे. 

श्री. मलकानी यांनी नागपूरमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी परिपूर्ण परिसंस्था असून उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगितले. मी मूळचा महाराष्ट्राचा असल्याने महाराष्ट्रातच उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

                                                                                                                                 

सामंजस्य कराराचा तपशील:

प्रकल्पाचे नाव : हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना

ठिकाण : नागपूर

गुंतवणूक : ₹8000 कोटी (8 वर्षांत)

रोजगार संधी : 2000

प्रस्तावित प्रारंभ वर्ष : 2026

 

ही भागीदारी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पावले ठरणार असून, भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

यावेळी मॅक्स एरोस्पेचे अध्यक्ष भरत मलकानी, व्यवसाय विकासच्या प्रमुख मेघना मलकानी, मुख्य आर्थिक अधिकारी किरीट मेहता, अध्यक्ष जयेश मेहता, सल्लागार नीरज बेहेरे, सल्लागार  देवदत्त वानरे आदी उपस्थित होते.

00000

 


Friday, 13 June 2025

विभागीय लोकशाही दिनात एकही अर्ज प्रलंबित नाही

 

 

नागपूर, दि 9 :  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुक्तालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकही प्रकरण प्राप्त झाले नाही व यापुर्वीच्या लोकशाही दिनातील कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही. 

विभागीय आयुक्तालयात आयोजित लोकशाही दिनात अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) तेजुसिंग पवार, शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, वस्तू व सेवा कर, कामगार विभाग, जिल्हा परिषद, अपर राज्यकर आयुक्त, मुख्य वनरसंक्षक आदि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

00000