नागपूर जिल्ह्यातील
जलजीवन मिशनचा घेतला आढावा
नागपूर,
दि. 26 : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची प्रलंबित कामे 10 ऑगस्ट 2025 पर्यंत
पूर्ण करण्याचे निर्देश, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज
अधिकाऱ्यांना दिले. जल जीवन अंतर्गत 1302 योजनांची सर्व कामे गुणवत्तापूर्णरित्या करावीत
असेही त्यांनी सांगितले.
नियोजन भवन येथे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली
नागपूर जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यात
आला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.
आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार विकास ठाकरे आणि संजय मेश्राम, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे आदी
उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध योजनांची
माहिती श्री. बावनकुळे यांनी यावेळी जाणून
घेतली. या मिशन अंतर्गत येणाऱ्या योजना व यातील अपूर्ण योजनांच्या खर्चाचा नव्याने
आराखडा तयार करावा, निधी प्राप्त झाल्यावर पुन्हा खर्चाचा आराखडा तयार करुन निविदा
काढाव्यात. एका कंत्राटदाराला दोन पेक्षा जास्त कामे देण्यात येऊ नये आदी सूचना करुन
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी येत्या 15 दिवसात प्रलंबित सर्व कामे
पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यात समाविष्ट
1302 योजना व यातील योजनांची पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावर असलेल्या योजना तसेच ग्रामपंचायतींकडे
हंस्तातरित करण्यात आलेल्या योजना, प्रलंबित
असलेली नळ जोडणीची कामे आणि केंद्र व राज्य शासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत करावयाच्या
कामांसाठी आवश्यक निधी आदींबाबत जिल्हा परिषदेच्या
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी सादरीकरण केले.
जिल्ह्यातील पाणी टंचाई कृती आराखडयातील आतापर्यंत हाती घेण्यात
आलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. बावनकुळे यांनी यावेळी जाणून घेतली. ज्या गावांमध्ये
पाण्यांचे स्त्रोत कोरडे झाले आहेत तिथे बंधारा बांधून पाणी अडवणे, जल पुनर्भरणाची
कामे हाती घेणे व अशा गावांमध्ये 15 लाखांच्या मर्यादेतील कामे तातडीने करण्याचे निर्देशही
श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले. महावितरण कंपनीकडून पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक
वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. महावितरणकडून शहरी
आणि ग्रामीण भागात उभारावयाची अतिरिक्त रोहित्रे, वीज वितरणाबाबत करावयाचे व्यवस्थापन
आदींविषयी श्री. बावनकुळे यांनी यावेळी यंत्रणांना सूचना केल्या. तसेच गावोगावांमध्ये
जाऊन जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी नियोजन करुन त्याची काटेकोर
अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
******
No comments:
Post a Comment