Monday, 18 August 2025

अधिक समृद्ध, सुरक्षित आणि विकसित नागपूर घडवूया - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 



 

विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

·         उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा व अधिकाऱ्यांचा गौरव

 

·         स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित

 

नागपूर,दि. 15 : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात वेगाने विकासकामे सुरू आहेत.  आरोग्य, शिक्षण, रोजगार या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०४७ पर्यंतचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यात नागपूर जिल्ह्याचे योगदानही मोलाचे ठरणार आहे. प्रशासन लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहकार्याने विकसित भारतासाठी योगदान देण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून अधिक समृद्ध, सुरक्षित आणि विकसित नागपूर घडवून विकसित भारतासाठी योगदान देण्याचे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरीक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

फाळणीच्या वेदना सोबत घेऊन आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याच्या भवितव्याकडे पाहिले. मोठा विश्वास व अपेक्षा त्यांनी शासनाकडून बाळगल्या. भारतीय स्वातंत्र्यापासून आजवरच्या टप्प्यातील अनेक स्थित्यंतरे आपण अनुभवली. गत एक तपापासून नागरिकांच्या अपेक्षांची ध्येयपूर्ती अधिक वेगाने होत असून विविध विकास योजनांच्या माध्यमातून भारताने जागतिक पातळीवर मोठे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रत्येक घटकातील व्यक्तीला विविध विकास योजनांच्या माध्यमातून प्रगती पथावर आणण्याचे ध्येय महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. या ध्येयानुसार ग्रामीण भागासह महानगरापर्यंत नागरिक उत्तम प्रशासनाची अनुभूती घेत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले.

 

पोलीस विभाग हा राज्याचा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. शहराला सुरक्षित ठेवण्यात पोलिसांची मोलाची भूमिका असते.  पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात  गरुडदृष्टी या उपक्रमाच्या माध्यमातून लक्षणीय काम झाले आहे.  समाज विघातक, द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट विविध माध्यमांवर आल्यास त्याला तत्काळ शोधून कारवाई करणे आता शक्य झाले आहे. मजबूत सुरक्षा व्यवस्था उभे करण्याचे काम नागपूर शहर पोलीस दलाने केले आहे. ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती, ऑपरेशन यु टर्न या अभियानाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी केलेल्या कामाचे कौतुक  पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर पोलीस सक्षमीकरणासाठी एका नव्या झोनची निर्मिती केली आहे. त्यातून नागरिकांच्या सुरक्षितते सह पोलीस दलाला मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

 

नागपूर शहर सीसीटीव्हीखाली आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न होत आहे. ग्रामीण पोलीस विभागाने सावनेर शहरात पहिली एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणा सुरू केली याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांचे त्यांनी जाहीर कौतुक केले. याच आधारावर नागपूर शहरातही शहरभर सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री बावनकुळे यावेळी म्हणाले.

 

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले. विभाग तसेच जिल्हा स्तरावर विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासावरही भर देण्यात येत आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत आहेत. जिल्हा परिषदेमार्फत अधिकाऱ्यांनी गावात जाऊन विविध योजनांची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे.   महानगरपालिकेचेही चांगले काम आहे. सर्वांसाठी घरे हे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. यात महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून राज्यात सर्वात जास्त काम नागपूर महानगरपालिकेत झाले आहे. बस, आरोग्य, शिक्षण सेवा यावर खऱ्या अर्थाने मोठे काम झाले असल्याचे ते म्हणाले.

 

            जिल्ह्याची आरोग्य सेवा पुढे जात आहे. नागपूर हे पहिले रोबोटिक सर्जरी करणारे ठरले आहे. रोबोटिक सर्जरीचा पहिला प्रयोग नागपूर शहरात  यशस्वी झाला आहे. यातून नवा नावलौकिक नागपूरच्या मेडिकल कॉलेजला मिळणार आहे. कौशल्य विकास, सामाजिक न्याय विभागात जोमाने काम होत आहेत. नव्या नागपूरचा संकल्प सर्वांनी मिळून केला आहे. अत्यंत विकसित नवीन नागपूर होणार आहे. लवकरच त्याला कॅबिनेटची मंजुरी देण्यात येणार आहे. विकासात माध्यमांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

******


No comments:

Post a Comment