नागपूर, दि.10 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य
संवादप्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक
धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह मध्य रेल्वेचे अधिकारी यावेळी
उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे आज नागपूर
(अजनी)-पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच याच कार्यक्रमात बेंगळुरू-बेळगाव
आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात
आला.
नागपूर(अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे
अंतर जवळपास बारा तासात कापणे शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा
वेळ वाचणार आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान
वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथील स्थानकावर
थांबून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे.
या प्रसंगी रेल्वेस्थानकाचा परिसर पुष्पहार, तोरण, पताका व फुलांनी
सजवण्यात आला होता. मुख्यमंत्री व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास विद्यार्थी, प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील रेल्वे मार्गांचा विकास म्हणजे विकसित भारताला आधुनिक
आणि गतिमान प्रवास सुविधांची भेट असून या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्र
आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास आता सुलभ आणि गतिमान होणार आहे. या सुविधेमुळे
स्थानिकांना व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार
आहे.
नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न -
मुख्यमंत्री
या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी वार्तालाप करताना मुख्यमंत्री
म्हणाले, विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून सद्यस्थितीत प्रवाशांना
महागडे तिकीट काढून खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो. शिवाय या प्रवासाला वेळही
अधिक लागतो. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने रेल्वे मंत्र्यांना नागपूर-पुणे रेल्वे
गाड़ी सुरू करण्याबाबत विनंती केली असता त्यांच्या सकारात्मक प्रतिसादातून ही सेवा
सुरू झाली. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस
गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी आहे. सध्या नगर-दौंड मार्गे पुणे येथे
जाणाऱ्या गाडीला शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा फेरा पडतो. त्यावर उपाय म्हणून रेल्वे
मंत्रालयाला असे सुचवण्यात आले आहे की, नगर ते पुणे असा थेट मार्ग तयार करण्यात आला
तर प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळही वाचेल. पुढील काळात याबाबत नियोजन करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व पुणे हा औद्योगिक पट्टा असून येथील विकास साधायचा
तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पुणे
नवीन एक्सप्रेस वे निर्माण करण्यात येणार असून त्याच्या 'राईट ऑफ वे' मध्ये या रेल्वे
मार्गाचा विचार केल्यास प्रवासाचे अंतर अधिक कमी करता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
000000
No comments:
Post a Comment