Sunday 31 July 2016

राज्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा

नागपूर दि.30 :  जनावरांचा विमा उतरविणेकरिता राज्यात 1 ते 15 ऑगस्ट पशुधन विमा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशी व संकरीत (गायी, म्हशी), पाळीव पशू  (घोडे, वळु, बैल व रेडे) आणि शेळया, मेंढयांचा समावेश करण्यात आला आहे.
योजनेअंतर्गत लाभ देणेकरिता जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 5 जनावरांचा समावेश आहे. विमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्ष किंमतीवर आधारित असते. जनावरांची किंमत ही वय, स्वास्थ्य व दुध उत्पन्नावर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी यांचेमार्फत निश्चित करण्यात येते. शेळया, मेंढया, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा झालेस अनुदान देय ठरविणेसाठी एक पशुधन घटक यावर आधारीत अनुदानाचा लाभ निश्चित करण्यात आला आहे. एक पशुधन घटक म्हणजे 10 शेळया, मेंढया, डुकरे असलेल्या लाभार्थींना एक पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देण्यात आहे.
दुभत्या जनावराची किंमत ही किमान तीन हजार रुपये प्रति लिटर प्रति गायीकरिता व चार हजार रुपये प्रति लिटर प्रति म्हैशीकरीता प्रति दिन दुध उत्पादनावर आधारी किंवा शासनाने ठरविले प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक बाजारातील आधारभूत किंमतीनुसार निश्चित करण्यात येते. अशा प्रकारे 50 हजार रुपये किंमतीच्या जनावरांचा विमा उतरविणेकरीता सर्वसाधारण लाभार्थीसाठी 705 रुपये व दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीसाठी 441 रुपये खर्च अपेक्षित आहे.
जनावराची ओळख निश्चित करण्याकरिता बारा अंकी विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला जनावराच्या कानात मारण्यात येतो. क्लेम देतेवेळी जनावरांचे कानात बिल्ला असणे आवश्यक आहे. कानातील बिल्ल्याद्वारेच जनावरांची पुर्णत: ओळख निश्चित करता येते. नेहमीच्या प्रचलीत पध्दतीने जनावरांचे कानात बिल्ला मारण्यात येतो. विमा उतरविलेले जनावर पशुपालकाने विमा मुदतीत विक्री केलेस, हस्तांतरीत केलेस सदर विमा नवीन लाभार्थीस हस्तांतरीत करता येईल. तथापी सदर हस्तांतरणाची कार्यवाही त्यासाठी आवश्यक फी, सेलडीड याबाबत विमा कंपनीस कंत्राट देणेपूर्वी सदरची भूमिका विमा कंपनीच्या संमतीने निश्चित करण्यात येते.
विमा क्लेम निकाली काढणेची पध्दत : विमा क्लेम निकाली काढणेकरीता कवेळ चार कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील. लसे की, जनावरांचा विमा उतरविलेची मुळ पॉलिसी, जनावर मृत झालेबाबत विमा कंपनीस दिलेली सूचना, क्लेम फॉर्म व शविच्छेदन प्रमाणपत्र, तसेच मृत जनावराचा कानातील टॅगसह व विमा लाभार्थी यांचा एकत्रित छायाचित्र. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या 1800 2330418 व विमा कंपनीच्या 1800 2091415 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा किंवा www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळवर भेट द्यावी.
00000000

No comments:

Post a Comment