Friday 29 July 2016

वाघांचे संरक्षणासाठी संकल्प करुया -मुख्यमंत्री


Ø  जल-जंगल-जमीन आणि जनावरे याकडे विशेष लक्ष देणार
Ø  पडी जमीनीवर बांबू लागवड करावी
Ø  येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत टायगर महोत्सव घेणार
Ø  वन खात्याला देशात आदर्श करणार
Ø  आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन  उत्साहात संपन्न
Ø  वाघाशिवाय अन्न साखळी संतुलित राहू शकत नाही
Ø  निसर्गाने भरपूर दिले, आता परतफेड करण्याची गरज आहे.

नागपूर, दि.29 :  वन विभाग महाराष्ट्राचे भाग्य बदलू शकते. अशाप्रकारचे कार्य या खात्याने केले आहे. दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही करुन दाखविला. राज्यात सातत्याने येणारा दुष्काळ हा मानव निर्मित आहे. निसर्गाच्या सततच्या शोषणामुळे हे अस्मानी संकट आपल्यावर ओढवले आहे. ते कायमचे दूर करावयाचे असेल तर जल-जंगल-जमीन आणि जनावरे या चार गोष्टीकडे  भविष्यात विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
छिंदवाडा रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदघाट्क म्हणून बोलत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी हे होते. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, वन राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन सचिव विकास खारगे, आमदार समीर मेघे, प्रा. अनिल सोले, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक आहे. निसर्गाने आतापर्यंत आपल्याला भरपूर दिलेले आहे. आता त्याची परतफेड करण्याची गरज आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी वाघांचे रक्षण करावे लागेल. कारण वाघच वन संपदा, जलसंपदा, मातीचे रक्षण करुन निसर्गाला सुरक्षित ठेवू शकतो. वाघाशिवाय अन्नसाखळी संतुलित राहू शकत नाही. जंगलाच्या राजा वाघामुळेच अन्नसाखळी जीवंत आहे. एकीकडे वाघाचे संवर्धन करणे, तसेच वृक्ष लागवड करुन वनांची जोपासना करणे या दोन पातळयांवर आपल्याला काम करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात वनांचे क्षेत्रा वाढवित असतांना वृक्ष लागवड करतेवेळी दोन वर्षाचे झाड लावण्याची गरज आहे. त्यामुळे लावलेली झाडे जीवंत राहू शकतील. पुढील वर्षी पाच कोटी नवीन वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे.  यासाठी मागील एक वर्षापासूनच वृक्ष लागवडीची तयारी करुन ठेवली आहे. यावर्षी लावलेल्या प्रत्येक झाडाची माहिती नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या जागेवर नवीन झाडे लावण्याचा प्रसंगच येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
                        आज राज्यातील ज्या वन समित्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले, त्यांचे मी यावेळी विशेष अभिनंदन करतो. कारण त्यांनी खऱ्याअर्थाने वनांचे रक्षण केले आहे. वनालगत राहणारे शेतकरी नेहमी वन्यप्राण्यामुळे आम्हाला शेती करण्यास अडथळे निर्माण होतात अशी तक्रार करीत होते. परंतु माया नावाच्या वाघिणीमुळे गावकऱ्यांना 18 कोटी रुपयाचा महसूल मिळाला आहे. ‘जय’ नावाच्या वाघाचा जो आज शोध सुरु आहे. त्याच्यामुळे 14 कोटी रुपयाचा महसूल गावकऱ्यांना मिळाला आहे. असेही मुख्यामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वनांच्या बफर एरियाच्या बाहेर जेथे शेतकऱ्यांना शेती करणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी इकोटुरिझम सुरु करुन पर्यटकांना आकर्षित करण्याची योजना आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रोजगार प्राप्त होईल. अलीकडे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. समाज मनात प्राण्यांविषयी आस्था निर्माण झाली आहे. ‘जय’च्या न दिसण्यामुळे समाज मन अस्वथ झालेला आहे. हा फारमोठा बदल प्राण्यांच्या बाबतीत दिसून येत आहे. वनसंपदेमुळे आपल्याला 9 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नितीन गडकरी
            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात जल-जमीन-जंगल यावर आपले भविष्य अवलंबून आहे. महाराष्ट्रात नागपूरच्या परिघात वाघांची संख्या मोठयाप्रमाणात आहे. जगाच्या इतिहासात एवढे वाघ उपलब्ध असणे हा योगायोग आहे. जनतेच्या सहयोगामुळे येणाऱ्या काळात वाघाचे संरक्षण करण्यात निश्चितपणे यशस्वी होऊ अशी ग्वाही दिली.
            वनाधारित उपक्रमांची सुरुवात राज्यात करण्याची गरज आहे. गडचिरोली, मेळघाट सारख्या भागात वनऔषधी मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. वनांवर आधारित उद्योग उभारल्यास रोजगार निर्मिती मोठया प्रमाणात होऊ शकेल. वने समृध्द तर व्हावीच सोबतच पर्यावरण व विकास यांचा समतोल राखण्याची गरजही गडकरी यांनी व्यक्त केली.
            नागपूर विभागात 18 नवीन कोल माईन्स सुरु करण्यात आल्या आहेत. या कोल माईन्समुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रेतीचे डम्प दिसणार नाही. या रेतीचा उपयोग उद्योगासाठी करण्यात येईल. कोल माईन्सच्या ठिकाणी 35 हेक्टर क्षेत्रात बांबूचे वन लावण्यात येणार आहे. देशात बांधण्यात येणाऱ्या दोन लाख किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा बांबूचे वन लावण्यात येईल. या बांबूद्वारे इथेनॉल तयार होते. याचा उपयोग प्रदूषण टाळण्यासाठी होईल. राज्यात असलेल्या पडीत जमीनीवर मोठे हिरवे वन व वनावर आधारित उद्योग सुरु करण्याची सूचनाही गडकरींनी यावेळी केली.
सुधीर मुनगंटीवार
            राज्याचे वन, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ग्रीन आर्मीची सुरुवात करण्यात येत असल्याची घोषणा केली. प्रत्येक व्यक्तीने या वसुंधरेचे दूत व्हावे व चार वृक्ष लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही केले. 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लावणारच असा संकल्पही यावेळी मुनगंट्टीवार यांनी जाहीर केला.
            वन समृध्द करणे हे सर्वांचे काम आहे. सात हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली. त्याही पूर्वी वाघाचे अस्तित्व होते. भारताच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संवर्धनामध्ये घनदाट ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प केंद्रस्थानी आहे. 2014 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेच्या निकालानुसार भारतात 2010 मध्ये केवळ 1706 वाघच उरले होते, परंतु ती संख्या 2014 मध्ये 2226 पर्यंत वाढली. महाराष्ट्रातील वाघांची संख्या 190 च्या घरात आहे. जी 2010 मध्ये 169 इतकीच होती. असेही ते म्हणाले.
            येत्या 11, 12 व 13 नोव्हेंबरला मुंबईस टायगर महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. वन विभागाच्या या सर्व उपक्रमास सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात हा वन विभाग आदर्श विभाग म्हणून नावलौकीक मिळवेल याची मला खात्री आहे, असेही मुनगंट्टीवार म्हणाले.
विकास खारगे
            राज्याचे वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाला दोन अंग आहे. तो जसा जागृतीचा दिवस आहे, तसाच तो साजरा करावयाचाही दिवस आहे. जगभरात वाघांची संख्या अत्यंत कमी होऊन हा प्राणीच नामशेष होण्याचा मार्गावर होता परंतु प्राण्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनेक संस्थांनी हा अदभूत प्राणी नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी शपथ घेतली. ताडोबा, अंधारी, पेंच, मेळघाट, बोर, सह्याद्री आणि नागझिरा हे विभाग व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखले जातात. वाघांची संख्या वाढावी यासाठी शासन पाऊले उचलित असल्याचेही खारगे यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान वन मुख्य संरक्षक श्री. भगवान यांचेही भाषण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोर टायगर, जलयुक्त शिवार, फुलपाखरु व गिधाडे या पुस्तकाचे तसेच आमदार प्रा. अनिल सोले यांनी वन संवर्धनासाठी काढलेल्या दिंडी यात्रेच्या सीडीचे, तसेच वाघांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अमोल बैस व रमण कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनाचे पुरस्कार वितरण करण्यात आले. 2013-14 या वर्षात ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील गोठणगाव व अहमदनगर जिल्हयातील गुंडेगाव, तसेच नागपूर जिल्हयातील निमजी या गावास प्रथम पुरस्कार देण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2014 हे पुरस्कारही यावेळी वितरीत करण्यात आले.
            तसेच 1 जुलै रोजी साजरा करण्यात आलेल्या वृक्ष लागवड दिनी सेल्फी विथ ट्री ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेत विजयी ठरलेले ऋषिकेष बावणे (अमरावती), मनीष मंत्री (वाशिम), सुरेश पॉल, देवांश चौरसिया, नितीन रेवतकर (नागपूर) यांना पिरॉमिड सिटीचे प्रदीप तातावार यांच्या वतीने ॲपल आयफोन 6 देण्यात आले.
            सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्याचे स्वागत पिंपळ वृक्ष, वाघाचे स्मृतीचिन्ह व पर्यावरणाचे रक्षक विष्णोईची प्रतिकृती देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी, तर आभार उपवनसंरक्षक किशोर मिश्रीकोटकर यांनी मानले.
            या कार्यक्रमास राज्यभरातून वनप्रेमी आले होते. क्रीडा संकुल संपूर्णपणे भरले होते. जी.एच रायसोनी विद्यालय, दिल्ली पब्लीक स्कूल, ईरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर नाटीका सादर केल्या.

कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद
             आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अप्रतिमच होता. मानकापूर येथील इनडोअर स्टेडियम खचाखच भरला होता. वन आणि व्याघ्रचे संरक्षण आणि लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्यामागचा उद्देश होता. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी शासनाने उचललेलं पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. गेल्या 1 जुलै  रोजी एकाच दिवशी अडीच कोटीच्यावर वृक्ष लावून वेगळा संदेश दिला.
            नागपूरची ओळख आता टायगर कॅपिटल म्हणून होत आहे. नागपूरच्या तिनशे किलोमीटरच्या परिघात तिनशेच्या जवळपास वाघ आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नागझिरा व बोर हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. आता पर्यटकही आकर्षित होताना दिसत आहे. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेटके नियेाजन,  उत्तम बैठक व्यवस्था व सर्वांगसुंदर प्रकाश योजना होय. टपाल तिकिटाचे प्रकाशन याच कार्यक्रमात झाल्याने ताडोब्याचा वाघ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. याच कार्यक्रमात संत तुकाराम वनग्राम योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम समित्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिवाय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
            या  कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जिथे वाघाचे अस्तित्व तेथे वनसमृद्ध, जेथे वनसमृद्ध तेथील जीवन समृद्ध एक वृक्ष दहा पुत्र समान भारतातील 350 नद्यांचा उगम, वाघांच्या नैसर्गिक अधिवासातून; आपला महाराष्ट्र 190 वाघांचे घर आदी  घोष वाक्य इनडोअर स्टेडियम टिकवण्यासाठी लावण्यात आले होते, त्यामुळे वातावरण निर्मिती झाली होती.
            पुरस्कार प्राप्त व्यक्तिंची बसण्याची सोय उत्तम पद्धतीने करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी पर्यावरण, जल, जंगल, जमीन व जनावरांचे महत्त्व विषद करताना उत्तम आयोजनाबद्दल कौतुकही केले.
            आजच्या व्याघ्र दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाबद्दल निश्चित जनजागृती झाली. ही सुरु झालेली चळवळ अधिक दृढ होईल, हे मात्र निश्चित.
00000000



No comments:

Post a Comment