Sunday, 24 July 2016

आरोग्य सेवेतील हयगय गंभीरपणे घेणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Ø  सावरगाव येथील घटनेची गंभीर दखल
Ø  जिपच्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी ग्रामस्वच्छता मोहिम राबवावी
Ø  पुढील आठवडयात आरोग्य सेवेचा आढावा घेणार
 
नागपूरदि23 : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.रुग्णांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. अनास्था आढळून आल्यास संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर कडक कारवाई  करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एका बैठकीत दिले.
रविभवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, नागपूर मनपाचे अप्पर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, डॉ. पिनाक दंदे, डॉ. अनुप मरार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे नागपूर शाखा अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई व इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते.
सावरगाव येथे गॅस्ट्रोने मृत्यू पावलेल्या रुग्णांबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी स्वच्छतेच्या बाबतीत ज्यांनी निष्काळजीपणा केला. त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. येत्या  आठ दिवसात संपूर्ण जिल्हा व नागपूर जिल्हयांत फॉगिंग करावे. जेणेकरुन डासांचे प्रमाण कमी होईल. स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यात यावी. मनपा, जिल्हापरिषद व जिल्हा प्रशासन यांनी  साथी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाय योजनांचा तपशील दररोज रात्री आठ वाजता ई-मेलवर पालकमंत्री  कार्यालयात द्यावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
रिकामे भूखंड, नाल्या यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा निपटारा करणे गरजेचे आहे. उघडयावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. ग्रामसेवक, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांनी गावात स्वच्छतेच्या बाबतीत गावकऱ्यांना प्रबोधन करावे. विशेषत: विद्यार्थ्यांना याकामात गुंतवावे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
पालकमंत्री दोन दिवस
गावात मुक्कामाला राहणार
ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालकमंत्री दोन दिवस जिल्हयातील एका गावात मुक्काम करुन गावातील सोयीसुविधांचा आढावा घेणार आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांने एक दिवस गावात राहावे, असेही पालकमंत्र्यांनी सूचित केले. नागपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी दोन दिवस कार्यशाळा घेण्याची तयारी दर्शविली.
डॉ. पिनाक दंदे व डॉ. अनुप मरार यांनी स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली. जनमंचचे प्रभाकर खोंडे, संदीप कश्यप, डॉ.संजीव गोल्हर या अशासकीय सदस्यांनीही सूचना केल्या. यासमितीचे सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे यांनी मागील बैठकीतील विषयावर केलेल्या कार्यवाहीचे पालकमंत्र्यांना माहिती दिली.
सावरगाव येथे गेल्या आठवडयात गॅस्ट्रो आजाराचा उद्रेक झाल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 838 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैंकी 280 आंतररुग्ण होते. यानंतर तातडीने ग्रामपंचायतमार्फत सार्वजनिक  व खाजगी विहिरींच्या 81 जलस्त्रोतांचे क्लोरीनेशन करण्यात आले. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन ग्रामसफाई अभियान राबविण्यात आले. सध्या चिखली येथील 3 विहिरीतून सावरगावला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापावेतो 64 जलस्त्रोतातून पाणी नमूने घेण्यात आले. त्यातील 16 पाणीनमुने अयोग्य आढळले. स्वाईन फ्लू या आजाराचा एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढळला, असून त्याचा मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्हयात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नाही. अशी माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. योगेंद्र सवई यांनी दिली.
मांढळ येथे नियमित आरोग्य अधिकारी देण्यात यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. नागपूर जिल्हयात 18 वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जागा रिक्त आहेत, असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले. या समितीची पुढील बैठक येत्या 7  दिवसात घेण्यात यावी. बैठकीत आरोग्यविषयक सर्व अहवाल सादर करावा. आरोग्य सेवेत कोणतीही हयगय होता कामा नये, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
*****

No comments:

Post a Comment