Friday 29 July 2016

पूर्व नागपूर परिवहन कार्यालयात सर्वात अत्याधुनिक सुविधा -देवेंद्र फडणवीस



    *उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीचे भूमिपूजन
    *अत्याधुनिक इमारतीवर रुपये 30 कोटी 63 लक्ष खर्च
नागपूरदि.29 :  नागपूर शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दोन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असावे,  यादृष्टिने नागपूर शहर पूर्व विभागासाठी स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून या कार्यालयामध्ये देशातील परिवहन विभागाच्या अत्याधुनिक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यत येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर मौजा चिखली येथे 18 हजार चौरस मीटर जागेवर बांधण्यात येणाऱ्या पूर्व नागपूर शहर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर विशेष अतिथी म्हणून ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, प्रा. अनिल सोले, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन आयुक्त श्याम वर्धने तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यामार्फत वाहनचालकांना जलद सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूर्व नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारतीचे बांधकाम आकर्षक पद्धतीने व एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देणारे असावे. अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे बांधण्यात येणाऱ्या व सर्व सुविधायुक्त दोन मजली बांधकाम असलेल्या  इमारतीचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. आमदार कृष्णा खोपडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पूर्व नागपूरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची सुरुवात केल्यामुळे येथील जनतेला सहज सुलभपणे सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे नाममात्र दरात साडे चार एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून कार्यालयासोबतच परिवहन विभागाचे  अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रही येथे सुरु करावे. अशी सूचना केली. पूर्व नागपुरात गृहनिर्माण, रस्ते विकास, पाणी पुरवठा तसेच मूलभूत सुविधा असलेल्या  दोन हजार कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
नागपूर सुधार प्रन्यासच्या चिखली (व्यवस्था) या जागेवर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बांधण्यात येणार असून दोन मजली असलेल्या या इमारतीमध्ये तळमजल्यावर वेटिंग हॉल, परमिट सेक्शन, ट्रान्सपोर्ट सेक्शन, नॉन ट्रान्सपोर्ट सेक्शन, परवाना सेक्शन आदी सुविधा राहणार असून पहिल्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल बांधण्यात येणार आहे.
यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत, नगर रचना सहसंचालक, एन. एस. अढारी,प्रादेशिक परिवहन अधिकारी, डॉ. डी. टी. पवार, शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. बेलसरे, रविंद्र भुयार, विजय चव्हाण, प्रशांत झाडे, श्री. निमजे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता अशोक गौर, श्री. गुज्जलवार, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त, नगरसेवक, विविध संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
                                                                                            ****** 

No comments:

Post a Comment