नागपूर, दि. 9 : कर्क रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे या आजारावर प्रभावी व परिणामकारक उपचारासाठी संशोधन होण्याची गरज असून सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा स्वस्त व सुलभपणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
हॉटेल सेंटर पॉइंट येथे इंटरनॅशनल कॅन्सर काँग्रेस-2016 चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, परिषदेचे मुख्य समन्वयक तथा हेल्प केयर ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. अजय मेहता, डॉ. दिलीप रोडे, डॉ. राजेश बडवे, डॉ. युर्वेश पारीख, डॉ. सुचित्रा मेहता आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज असल्याचे सांगतांना नितीन गडकरी पुढे म्हणाले की, संशोधन हे देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून गरिब व सामान्य जनतेला आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. ही गरज भरुन काढण्यासाठी केंद्र शासन धोरण तयार करत आहे. शासकीय महाविद्यालय व खाजगी रुग्णालयाच्या समन्वयाने या क्षेत्रात प्रभावी व परिणामकारक सुविधांमध्ये वाढ करण्यासंदर्भातही उपाययोजना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात विशेषत: कर्क रोगाबाबत चांगल्या संशोधनाचा लाभ सामान्य जनतेला होण्याच्या संदर्भात नाममात्र शुल्कावर नागपूर सुधार प्रन्यासतर्फे जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून कर्क रुग्णावरील उपचार सुलभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतांना कर्करोग नियंत्रणासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याची आवश्यकता यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
कर्करोग नियंत्रण व उपचाराच्या संदर्भात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मभूषण डॉ. प्रफुल्ल देसाई, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. हरीश कुलकर्णी, कोईंबतूरच्या जीईएम हॉस्पिटल आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सी. पलनीवेलू, इंडियन कॉलेज ऑफ पॅथेलॉजीच्या डीन डॉ. अनिता बोर्जेस यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय कॅन्सर काँग्रेसच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी शुभेच्छा संदेशामध्ये कर्क रुग्णांच्या प्रभावी उपचाराबाबत या परिषदेमध्ये विचारमंथन होणार असून त्याचा लाभ गरिब व गरजू रुग्णांना होणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे या कार्याक्रमास उपस्थित राहू शकलो नाही असेही त्यांनी आपल्या संदेशात सांगितले.
प्रारंभी आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख समन्वयक डॉ. अजय मेहता यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात आंतरराष्ट्रीय कॅन्सर काँग्रेसच्या आयोजनासाठी देशातील दहा प्रमुख संस्था सहभागी झाल्या असून यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेला 1 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असून नागपूर कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या सहयोगाने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाबाबत प्रभावी उपचाराच्या पद्धतीत तसेच सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने सुविधांची उपलब्धता हा उद्देश आहे. कर्करोगासारख्या दुसऱ्या महत्त्वाच्या आजारावर लक्ष वेधण्यासाठी तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात दोन दिवस या परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून सादरीकरण होणार आहे.
नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून अत्याधुनिक केंद्र असलेले रुग्णालय लवकरच सुरु होत असल्याचेही डॉ. अजय मेहता यांनी सांगितले. यावेळी डॉ. कृष्णा कांबळे यांनी संपादित केलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंजली भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुचित्रा मेहता यांनी केले. यावेळी अविनाश पांडे, डॉ. गिरीश गांधी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कॅन्सर तज्ज्ञ उपस्थित होते.


No comments:
Post a Comment