नागपूर, दि. 9 : नागपूर हे उपराजधानीचे व औद्योगीक, शैक्षणिकदृष्टया झपाटयाने वाढणारे देशातील महत्वाचे शहर आहे. शहराच्या मध्यभागी बांधण्यात येत असलेल्या विस्तृत ,सुसज्ज व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण नियोजन सभागृहामुळे विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सदर येथील जुन्या ग्रामीण तहसील कार्यालयाच्या जागेवर 6 कोटी 37 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा पायाभरणी व कोनशिला अनावरण प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधीर पारवे, आमदार सुनील केदार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर, नियोजन अधिकारी कृष्णा फिरके उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, नियोजन सभागहामुळे नागपूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून या इमारतीचे काम चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजे. यात कसल्याही प्रकारची कमतरता असू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर यांनी प्रास्ताविकात नियोजन भवनाच्या इमारती विषयी माहिती देतांना सांगितले की, ही इमारत मार्च 2017 मध्ये पूर्ण होणार असून या इमारतीवर 6 कोटी 37 लक्ष रुपये खर्च होणार आहे. नागपूर हे उपराजधानीचे व औद्योगिक व शैक्षणिकद्ष्ट्या झपाट्याने वाढणारे देशातील महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठकीसाठी पूर्वीचे सभागृह हे अपुरे पडत होते. त्यामुळे शराहाच्या मध्यभागी विस्तृत व सुसज्ज आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे जिल्हा नियोजन सभागृह बांधण्यात येत आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके व उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यांनी मानले.
****


No comments:
Post a Comment