Saturday 20 August 2016

शहरातील 44 शाळांमधील 5 हजार 500 विद्यार्थ्यांना मोफत भोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



           माध्यान्ह भोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरु
·         मनपाच्या 24 व 20 खाजगी शाळांचा समावेश
·         अक्षय पात्र फाउंडेशनचा पुढाकार
·         मनपाच्या सर्व शाळा डिजिटल होणार

नागपूर, दि 20 : नागपूर महानगर पालिकेतील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याची क्षमता केन्द्रीकृत स्वयंपाकगृह प्रणालीत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर शहरातील 44 शाळांमधील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार पुरविण्यात येईल. यात महानगरपालिकेच्या 24 व 20 खाजगी शाळांचा समावेश आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम अक्षय पात्र फाउंडेशन तर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
वर्धा रोडवरील विकासनगरातील विेवकानंदनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळेत केन्द्रीकृत आहार वितरण प्रणाली मार्फत शालेय पोषण आहार वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर सतीश होले, आमदार सर्वश्री आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, अक्षय पात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दासा, गार्डियन डोनर श्रीमती वंदना टिळक व रवि टिळक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रविंद्र कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
बंगळूरच्या अक्षय पात्र फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजनाची संकल्पना मांडण्यात आली. खरे तर ही कल्पना 11 वर्षापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्र्यासमोर मी मांडली होती. पण ती पूर्ण झाली नाही. आता ती प्रभावीपणे राज्यात राबविण्यात येत आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अतिशय आरोग्यदायी अशा यंत्रणेच्या माध्यमातून हे सकस आणि जीवनसत्वयुक्त भोजन विद्यार्थ्यांना दिले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
केंद्रीभूत किचनच्या पद्धतीमुळे शारीरिक आरोग्याचे संवर्धन करतांना बचत गटांनाही यात सामावून घेतले आहे. नागपुरात या योजनेअंतर्गत 32 बचतगटांना वितरणाचे काम देण्यात आले आहे. श्रीमती वंदना टिळक यांचे यावेळी विशेष आभार मानावे लागेल. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रिर्त्यथ वर्षभर मोफत जेवण देण्याची तयार दर्शविली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.                                                    
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासह त्यांचे योग्य पोषण होण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. टाटा ट्रस्ट सारख्या संस्थांसोबत झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विविध उपेक्षित भागात मदतीचा हात मिळाला असून कुपोषण निर्मूलन, दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण या उद्दिष्ठांसाठी शासन गेल्या दोन वर्षापासून प्रभावी योजना राबवित आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार देण्यासाठी सरकारकडून केंद्रीभूत किचनची सुविधा पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहे.  महिला आणि बालविकासासाठी सरकारच्या अधिक प्रभावी उपाययोजनांमुळे माता मृत्यू दरात 84 वरुन 67 इतकी लक्षणीय घट झाली आहे. त्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्भक मृत्यू दरातही शासनाने गेल्या दोन वर्षात चांगली कामगिरी केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातही केंद्रीभूत किचनची सुविधा शाळांना उपलब्ध करुन द्यावयाची असल्यास या संदर्भात पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकस आहार देता येणे शक्य होईल. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत जून 2015 ते 2016 या कालावधीत राज्यातील 66 हजार प्राथमिक शाळांमधील 11 हजार शाळां 100 टक्के प्रगत म्हणून जाहीर झाले आहे. पुढील जून पर्यंत या शाळांची संख्या 33 हजारांपर्यंत करण्यात येणार आहे. या शाळांनी 100 टक्के लर्निंग आऊट कमची श्रेणी प्राप्त केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतीमध्ये नुकताच डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांमध्ये व्हर्चुअल व डिजिटल क्लासरुम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा असलेला ओढा कमी होईल. नागपूर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल क्लासरुम तयार करण्यासाठी महापौरांनी योजना तयार करावी. शासनातर्फे डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. त्यामुळे महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात अक्षय पात्र फाउंडेशनतर्फे माध्यम भोजन योजना सुरु केल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढेल. या योजनेचा फायदा झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला.
महापौर प्रवीण दटके यांनी आपल्या भाषणात महानगरपालिकां शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. परंतु हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आल्यामुळे मागीलवर्षी फक्त 600 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळात प्रवेश घेतला होता. आता सर्वं शाळा डिजिटल करण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले.
प्रास्ताविक भाषण मनपाचे शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी केले. यावेळी अक्षय पात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दासा यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात अक्षय पात्र तर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दटके दीप प्रज्ज्वलन केले. यावेळी श्रीमती वंदना टिळक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यन्ह भोजनाचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
या कार्यक्रमास नगरसेवक, शालेय विद्यार्थी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment