Saturday 20 August 2016

अविकसित व मागास भागात सहकाराचे जाळे निर्माण होण्याची आवश्यकता -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



       
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या
                    11 व्या शाखेचा थाटात शुभारंभ
नागपूर, दि 20 : अविकसित व मागास भागात सहकाराचे जाळे विणल्यास त्या भागाची निश्चित प्रगती होईल. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीने नागपुरात शाखा सुरु करुन या भागातील लोकांना संधी प्राप्त करुन दिली आहे. आपण चांगल्या भावनेने एखादी संस्था सुरु केली तर त्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही. असे उद् गार देवेंद्र फडणवीस यांनी केले.
  गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या 11 व्या शाखेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुरेश धानोरकर, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार आशिष देशमुख कार्याध्यक्ष राजुदास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  90 टक्के भांडवल पुरविणाऱ्या संस्थांचे जाळे प्रगत भागात असल्यामुळे त्या भागाची प्रगती होत गेली. तेथील उद्योग व्यवसायाची वाढ झाली. मागास व अविकसित भागात सहकारी संस्थांच्या शाखा टिकत नाहीत. भांडवल पुरविणाऱ्या संस्था नसतात. त्यामुळे मागास व अविकसित भागात सहकारी संस्थांचे जाळे अधिक प्रमाणात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विकास हा संधीच्या आधारावर होत असतो. बचतगटांना अशाचप्रकारची संधी मिळाल्यामुळे बचतगटांची चळवळ मोठी झाली आहे. राष्ट्रीयकृत बँका व महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून बचतगटाकरिता करण्यात आलेले अर्थसहाय्याची पूर्णपणे परतफेड नियमितपणे होते. कुणीही डिफॉल्टर नसतात. असे सांगून महिला बचतगटांना देण्यात आलेले 51 लक्ष रुपये ते परत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, सहकार क्षेत्रात राज्याने मोठी प्रगती केली आहे. बँका, सोसायट्या, विविधप्रकारचे औद्योगिक युनिटचे मोठे जाळे तयार झाले. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी अशा संस्थेत कर्ज मागणाऱ्यांना चांगली वागणूक मिळेलच याची हमी नसायची. लोकांवर पूर्वी दडपण असायचे. काहींनी सहकाराचा स्वाह:कार केला. आता विश्वास वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे सहकाराशी मोठे नाते जुळले आहे. सहकार संस्काराने चालतो. तेव्हा सहकारात सकारात्मक बदल होतात. असाच बदल गोदावरी अर्बन सोसायटीने करुन विकासात मोठे काम केले आहे.
दक्षिण-नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी तसेच सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी महिला बचतगट, समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना एकत्र घेवून सामान्यांचा फायदा करण्याच्या उद्देशाने नागपूर येथे 11 वी शाखा उघडली. या शाखेचे वटवृक्षात रुपांतर होईल. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. व सोसायटीला शुभेच्छा दिल्या. गोदावरी अर्बन सोसायटी ही प्रगतीची शिखरे गाठत जाईल. असा विश्वास व्यक्त करुन या भावनेने हेमंत पाटील, राजश्री पाटील यांनी ही संस्था सुरु केली हीच भावना कायम ठेवल्यास प्रगती कोणीही रोखणार नाही, असे उद् गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
यावेळी आमदार हेमंत पाटील, प्रवीण दरेकर यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकात सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला. या सोसायटीच्या माध्यमातून बचतगटांच्या महिलांनी ग्रामीण भागात सहकार नेला. त्यांचे चांगले कार्य सुरु आहे. मुंबईत महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी मोठे विक्री केंद्र सुरु व्हावे, असे सांगितले.
                                                                         *****

No comments:

Post a Comment