Thursday 18 August 2016

जलयुक्त शिवार अभियानाची कालबद्ध अंमलबजावणी करा -प्रा. राम शिंदे

  • जलयुक्त शिवार कामांचा आढावा
  • 1 सप्टेंबर पासून जलयुक्त कामांचे ऑनलाईन छायाचित्र
  • 1077 गावांमध्ये 21 हजार 599 कामे पूर्ण
  • विभागात 1 लक्ष 31 हजार 854 टीसीएम पाणीसाठा
  • माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाला प्राधान्य
  • सिंचन क्षमता वाढेल अशीच कामे घ्या
                        
नागपूर दि. 18 : जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामांची निवड करतांना शेतीसाठी प्रत्यक्ष संरक्षित सिंचनाचा लाभ होईल अशाच कामांना प्राधान्य देवून कालबद्ध कार्यक्रमानुसार कामे पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिल्यात.
नागपूर विभागातील जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करतांना ते बोलत होते.
डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ते होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, आमदार सर्वश्री सुनील केदार, डॉ.आशिष देशमुख, समीर मेघे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, राजेश उर्फ बाळा काशीवार, समीर कुणावार, चरण वाघमारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जलसंधारण सचिव पुरुषोत्तम भापकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, संचालक एस. एस. जाधव, मुख्य अभियंता शिवकुमार गिरी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त अभय महाजन,  अपर आयुक्त हेमंत बसेकर, उपसचिव किशोर पठारे, नारायण सराफ आदी अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमामुळे सातत्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या  पाण्याची टंचाई दूर करण्यासोबत शेतीला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी तसेच कायम टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना करताना प्रा.राम शिंदे म्हणाले की, अभियानाअंतर्गत नागपूर विभागात मागील वर्षी 1077 गावांमध्ये 21 हजार 599 कामे पूर्ण झालेली आहेत. यावर्षासाठी 904 गावांमध्ये 2307 कामे पूर्ण झाली असून 914 कामे प्रगतीपथावर असून यासाठी 316 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध देण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागीलवर्षी अपूर्ण राहिलेली कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करावी तसेच यावर्षी प्रस्तावित केलेली संपूर्ण कामे याचवर्षी पूर्ण होतील. यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना करताना जलसंधारण मंत्री पुढे म्हणाले की, अपूर्ण कामांबद्दल विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी वेळेत काम पूर्ण होईल याची खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यात जलयुक्त अभियानाअंतर्गत झालेल्या कामांसंदर्भातील संपूर्ण छायाचित्र एमआरसॅ या प्रणालीच्या माध्यमातून 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन टाकणे बंधनकारक करण्यात आले असून जीओ टॅगींगच्या माध्यमातून झालेल्या कामांचा दर्जा व योग्य वेळेत झाले किंवा नाही याची माहितीही देण्यात येणार असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, नागपूर विभागात मागील वर्षी 43 कोटी रुपयाचा निधी शिल्लक असून हा निधी खर्च करण्यासाठी कामाच्या वेळापत्रक तयार करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे
जलयुक्त शिवार कार्यक्रमामध्ये लोकसहभागातून वाढविण्यासोबतच विविध उद्योगाकडून मिळणाऱ्या सीएसआर निधीमधील कामे ही संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रांतर्गत वापरण्याची तरतूद केल्यास या अभियानाला चालना मिळणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम अंतर्गत 3 हजार 250 कोटी  रुपयांच्या प्रकल्पासाठी 3 वर्षांची मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.
जलसंधारण विभागातर्फे शंभर एकरापर्यंत सिंचन क्षमता असलेल्या प्रकल्पाचा 319 कोटी रुपये तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 350 कोटी रुपयाच्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावेत असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी व कालबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात असलेल्या सर्व यंत्रणाकडून कामे पूर्ण केल्यास कामे त्वरित पूर्ण होतील, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूर विभागातील माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनाचा महत्त्वाकांक्षी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागात असलेल्या 6 हजार 489 मालगुजारी तलावापैकी 1 हजार 414 तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी 207 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी शासनाने 150 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. या तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे सरासरी 1 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल असेही यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर यांनी नागपूर विभागात जलयुक्त शिवार अंतर्गत चांगले काम झाले असून मागील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करुन यावर्षीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा. नदी पुर्नरजीवन कार्यक्रमाअंतर्गत विभागाला 22 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असून तातडीने 11 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विभागात शेतकऱ्याच्या मागणीनुसार 11 हजार विहिरींचा कार्यक्रम प्रस्तावित असून नरेगा अंतर्गत 10 हजार कोटीचे कामे राज्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नागपूर विभागात मागील वर्षी व यावर्षी जलयुक्त शिवार अभियानात नागपूर विभागात 1 हजार 981 गावांची निवड करण्यात आली होती. मागील वर्षाचे अपूर्ण व यावर्षी सूचविण्यात आलेल्या एकूण 28 हजार 740 कामांसाठी 750 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी 3 हजार 216 कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 207 कामे पूर्ण झाली आहेत.
‘मागेल त्याला शेततळे’ या कार्यक्रम अंतर्गत 8 हजार 474 च्या उद्दिष्टापैकी 8 हजार 882 ऑन लाईन अर्ज केले. त्यापैकी 7 हजार 594 कामे सुरु झाली आहेत.
विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यात नागपूर, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 6 हजार 489 मामा तलाव अस्तित्वात आहे. या तलावातील पूर्ण गाळ काढला तर 1 लक्ष सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर विभागाचे जिल्हानिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधींनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लोकसहभाग वाढविण्यासाठी तसेच नियोजित वेळात कामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावनिहाय कामांची माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना केली. भंडारा जिल्ह्याची जलयुक्त शिवार या पुस्तिकेचे विमोचन जलसंधारण मंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासुळकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे व विजयी बोंद्रे यांनी केले. आभार प्रदर्शन उपायुक्त पराग सोमण यांनी मानले. यावेळी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच विभाग प्रमुख यांनी जलयुक्त शिवार विभागनिहाय सादरीकरण करुन विभाग व जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची व प्रगतीची माहिती दिली.  
****

No comments:

Post a Comment