Saturday 20 August 2016

नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्राचा सकारात्मक पुढाकार --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*   तरुणांनो सिगरेट, तबांखूपासून दूर रहा
*   थायराईड कॅन्सर सोसायटीमुळे तात्काळ उपचार शक्य
नागपूर, दि 20 : वेगाने वाढणाऱ्या कॅन्सर आजाराला पायबंद घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्र राज्य सक्रीय पुढाकार घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय थायराईड कॅन्सर व्यवस्थापन परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
हॉटेल प्राईड वर्धा रोड, नागपूर येथे थायराईड सोसायटी नागपूर आणि विदर्भ व सोसायटी ऑफ हेड अँड नेक ऑनकॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव डॉ.देवेन माहोरे, डॉ. आर. रवी, डॉ.प्रथमेश पै प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करुन पहिल्या राष्ट्रीय थायराईड कॅन्सर परिषदेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक स्तरावर कॅन्सर रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
थायराईड कॅन्सरच्या रुग्णात मोठी वाढ होतांना दिसत असून याबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. ही परिषद यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. थायराईड कॅन्सर विशेषज्ञ डॉक्टरांनी मिळून स्थापन केलेल्या या परिषदेमुळे सामान्य माणसाला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे सोईचे होईल. राज्याने अवयव दान रजिस्ट्रेशन मोहीम हाती घेतली असून याचा फायदा गरजू व गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून या तंत्रज्ञानाच्या आधारे परवडेल अशा खर्चात रुग्णसेवा देणे शक्य झाले आहे. यंत्रोपचारामुळे कुठल्याही आजारावर तात्काळ उपचार करणे शक्य होत आहे. अशातच आपण कोकीळाबेन रुग्णालयाला भेट दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात.
कॅन्सर विरोधी लढा देण्यासाठी थायराईड सोसायटी नागपूर मोठ्या प्रमाणात जागृती करेल. तरुण व युवा वर्गात सिगरेट तथा तंबाखूचे व्यसन पहायला मिळते, अशी खंत व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, तरुणांनी सिगरेट व तंबाखूपासून दूर राहावे. नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्र सकारात्मक पुढाकार घेईल असा पुनरुच्चार त्यांनी केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थायराईड सोसायटीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार संचेती म्हणाले की, कॅन्सर हा मधुमेहापेक्षाही वेगाने वाढणारा आजार असून थायराईड कॅन्सर सोसायटी या आजाराच्या निर्मूलनासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास आहे. यावेळी डॉ. तुलसीदास भिलावेकर यांचा उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवेंद्र माहुरे यांनी केले. यावेळी डॉ. मदन कापरे यांचे भाषण झाले. आभार प्रदर्शन डॉ.आर. रवी यांनी केले. या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment