Tuesday 20 September 2016

बाल स्वच्छता दुतांचा एक दिवस सीईओ सोबत



  • बाल स्वच्छता दुतांचा सीईओ सोबत थेट संवाद
  • पोस्ट कार्डच्या माध्यमातून गाव स्वच्छतेचा उपक्रम
  • शालेय मुलांनी अनुभवला जिल्हा परिषदेतील एक दिवस
  • विविध शाळांतील 25 विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर, दि. 16 :  माझ्या घरी आधी शौचालय नव्हते. बाबांना आग्रह करुन शौचालय बांधून घेतले आणि घरातील सर्वांनाच शौचालय वापराबद्दल आग्रह केला. माझ्या सोबतच गावातील लोकांना शौचालय बांधण्यासाठी आग्रह  धरल्यामुळे  गावात  व  शाळेतसुद्धा  आम्ही  शौचालयाचा वापर करतो. हे उद् गार आहेत मौदा तालुक्यातील सहाव्या वर्गात शिकणाऱ्या कु. साक्षी मधुकर राजगिरे या विद्यार्थिनीचे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील 25 विद्यार्थ्यांना बाल स्वच्छता दूत म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एक दिवस मुलांसोबत घालविला. यावेळी मुलांनी स्वच्छतेबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण संवाद या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने गावातील स्वच्छता व हागणदारी मुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या कार्याबद्दल मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती बलकवडे यांनी माहिती घेतली.  तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचेही कौतुक केले.
नरखेड, काटोल, पारशिवनी, उमरेड, भिवापूर आदी तालुक्यातून आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे 25 विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत घालविला. जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामाची ओळख व्हावी. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडील तसेच आजी-आजोबांना आग्रह करुन घरात शौचालय बांधून घेतलेल्या 25 विद्यार्थ्यांचा या उपक्रमामध्ये सहभाग होता.

स्वच्छतेचे बाल ॲम्बॅसॅडर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त जिल्हा ही संकल्पना ग्रामीण जनतेमध्ये अत्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबवितांना मुलांनी वडिलांकडे आग्रह धरुन शौचालय बांधून घेतले. ही घटना इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेसोबत शौचालय या उपक्रमात सहभागी करुन त्यांना बाल स्वच्छता दूत म्हणून प्रोत्साहन देण्याचा उपक्रम प्रथमच नागपूर जिल्हा परिषदेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे.
स्वच्छता आणि आरोग्य यासंदर्भात समाजजागृती आवश्यक असून विद्यार्थी घरात व समाजात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिक्षण संवाद या उपक्रमांतर्गत मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी फेटरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून या उपक्रमाची सुरुवात केली. या शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतच्या आपल्या संकल्पना व शाळेबद्दल असलेल्या भावना कळविल्या आहेत. हाच पत्रसंवाद जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असून मुख्य कार्यपालन अधिकारी यासुद्धा दर महिन्याला पाठविलेल्या पत्रांना उत्तर देणार आहेत.
वानाडोंगरी येथील पाचव्या वर्गातील कु. धनश्री राजेंद्र गोडबोले, कु. प्रियंका भिमराव भारद्वाज तसेच उपरवाही या शाळेतील कु. पूजा चिटके, झुनकी येथील सारिका भोयर, आलिशा मेश्राम, कु. जान्हवी राऊत, कु. रितू मेश्राम आदी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल केलेल्या कार्याची माहिती देतांना डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजाराबाबत काळजी घेतांना वैयक्तिक शौचालय बांधल्यामुळे आरोग्य चांगले असल्याचे तसेच शाळेतील वातावरण बदलत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निखील रौंदळकर, दिनेश मासोदकर, चैताली देशमुख, राधा राहांगडाले, अंजली पाटणकर, हर्षा सांबारे, श्वेता साबळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंदर्भात विविध माध्यमाद्वारे माहिती देतांना चित्रकला तसेच पोस्ट कार्डद्वारे पत्र संवाद, माहितीपट आदी उपक्रम राबविले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी  देवून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
***

No comments:

Post a Comment