Sunday 9 October 2016

सुंदरलालजी राय यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी -राज्यपाल राम नाईक ,---- सुंदरलालजी म्हणजे संघर्षातून जीवन उभं करणारं व्यक्तिमत्व- मुख्यमंत्री




नागपूर, दि.9 : पंडित दिनदयाळ उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दीला आज पासून सुरुवात होत आहे. दोन्हीही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी असून त्यांच्या  व्यक्तिमत्वाच्या व कार्याच्या सर्व पैलुंना एकत्र करुन  समाजासमोर मांडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय व डॉ. रुपा राय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुंदरलाल राय यांनी प्रतिकुल परिस्थितीत जनसंघाचे कार्य  अतिशय नेटाने  केले.  त्यांनी  घेतलेल्या कष्टाला अनुरुप असे काम या समितीने करावे असे राम नाईक म्हणाले. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी समारोहास दिल्ली येथून तर सुंदरलाल राय यांच्या जन्मशताब्दी सोहळयास नागपूर येथून आज सुरुवात होत आहे. या दोघांचे कार्य मोठया प्रमाणात समाजापुढे येणे गरजेचे असून समारोह समितीने त्यांच्या सर्व पैलूंना व संघर्षाला  एकत्रित करुन समाजा समोर ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.




पंडित दिनदयाळ उपाध्याय व सुंदरलालजी यांच्या कार्यात साम्य आहे. विपरीत परिस्थितीत सुंदरलालजींनी काम केलं. जनसंघाचा पाया ज्यांनी रचला, त्यात सुंदरलालजी सुद्धा   होते. त्यांच्या  पुण्याईमुळे माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना आता संधी मिळाली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेरणादायी राहिले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमाला चार पिढयाचे लोकं उपस्थित असून त्यांनी  नि:स्पृह भावनेने काम केले. जनसंघाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या स्मृतीला उजाळा नव्हे तर प्रेरणा घेण्यासाठी कार्यक्रम आवश्यक आहे. आपल्या परिवाराला त्यागून त्या काळात या लोकांनी काम केले असे मुख्यमंत्री म्हणाले. सुंदरलालजी यांच्या घटना व कार्य संकलीत करुन ते समाजासमोर आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी समितीला  केले.
कुठलाही  जनाधार नसतांना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत काम करणाऱ्या त्या काळातील नेत्यांच्या संघर्षाचा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा असून स्वर्गीय सुंदरलालजी हे त्यापैंकीच एक असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. सुंदरलाल राय यांच्या सारख्यांनी संघर्ष केला म्हणून आज आजचे सत्तेचे दिवस आम्हाला पहायला मिळाले असे ते म्हणाले. जुना इतिहास नवीन पिढीला माहिती करुन द्यावा म्हणून सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोह आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. पंडित दिनदयाळ उपाध्याय व सुंदरलालजी यांनी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्र निर्माणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या कार्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी समितीने कार्य करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिल सोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. रुपा राय यांनी मानले. कार्यक्रमास जनसंघाच्या जुन्या पिढीतील अनेक नेते तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
******

No comments:

Post a Comment