Sunday 9 October 2016

कोराडीचा महोत्सवाला राष्ट्रीय स्वरुप - पर्यटन मंत्री ----सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जुही चावला हिने रसिकांची मने जिंकली जुही चावला, डॉ.निशीगंधा वाढ महाआरतीत सहभागी



नागपूर, दि.9 : श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या नवरात्र उत्सवा सोबतच कोराडी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनामुळे या महोत्सवाला राष्ट्रीय महोत्सवाचा दर्जा मिळाला असून यापुढेही कोराडी महोस्तव मोठया प्रमाणात आयोजन करण्यात संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
अष्टमीच्या शुभ पर्वावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जुही चावला, डॉ. निशीगंधा वाढ यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पर्यटन मंत्री बोलत होते.
मध्यभारतातील जागृत देवस्थान असलेल्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या महोत्सवास लाखो भाविक सहभागी होतात. त्यांना धार्मीक पर्यटनासोबतच सांस्कृतिक परंपरेची माहिती व्हावी यादृष्टीने पर्यटन महोत्सव आयोजनास पर्यटन विभागातर्फ आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व ज्योतीताई बावनकुळे यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला व डॉ. निशीगंधा वाढ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जुही चावला यांनी मराठीत भाषणाला सुरुवात करतांना कोराडी वाशियांना नमस्कार करुन नवरात्र व दुर्गा पुजेच्या शुभेच्छा दिल्या. गणेश चतुर्थीला श्रीमती अमृता फडणवीस यांनी दर्शनासाठी बोलाविले होते. त्यावेळी कोराडी महोत्सवाला उपस्थित राहण्याचा आग्रह केला होता. मनोकामना पूर्ण करणाऱ्या या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे सौभाग्य लाभले असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी विकासासाठी सुरु केलेल्या उपक्रमालाही शुभेच्छा दिल्या.
मराठी सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाढ यांनी आदीशक्तीला प्रणाम करुन कोराडी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजनामुळे सांस्कृतिक वारसा या महोत्सवामुळेच जतन होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मी भारतीय आहे, मला सार्थ अभिमान आहे या कवितेच्या ओळी गातांनाच कोराडी धार्मिक स्थळाच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 185 कोटी रुपयाच्या आराखडा लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रांरभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करुन पर्यटन विभागातर्फ महोत्सवासाठी 50 लाख रुपये दिल्याबद्दल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले. यापुढेही यापेक्षा मोठा महोत्सव  आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उदे गं अंबे उदे  हे महानाटय तसेच लोकनृत्य संध्या या कार्यक्रमाला भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
                 आज विवेक ओबेराय व मनोज तिवारी  

कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुरेश ओबेराय सांयकाळी 6 वाजता महाआरतीत सहभागी होणार आहे तसेच मनोज तिवारी यांचे जस गीत गायन होत आहे. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहन मंत्री नितीन गडकरी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. त्यानंतर आतिशबाजी व फटाका शो होणार आहे.

******

No comments:

Post a Comment