Tuesday 11 October 2016

तथागत गौतम बुध्दांच्या विचारामुळेच जगाला शांतीचा मार्ग गवसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






नागपूर, दि.11 :  तथागत गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा मार्ग दिला. त्यांचा शांतीचा संदेश ज्या देशानी आत्मसात केला ते देश आज विकासाच्या प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. आज जपान या देशाच्या प्रगतीचे मूळ हे तेथे रुजलेल्या भगवान गौतम बुध्दांच्या विचारांमध्ये आहे. आज ‘दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस’ येथे तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाथेय मिळावे, यासाठी देशविदेशातून नागरिक येतात. या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2016 च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तथागत गौतम बुध्दांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बुध्दवंदना घेतली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. मिलिंद माने,  ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक ॲड. सुलेखा कुंभारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 7 पासून ड्रॅगन पॅलेसला जोडणाऱ्या पोचमार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस येथे तथागत गौतम बुध्दांच्या पंचशील तत्त्वाची, दिव्यत्त्वाची आणि असिम शांततेची अनुभूती प्राप्त होते. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती लवकरच करण्यात येईल. तसेच दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतीगृहाची निर्मिती करण्यात येईल. टाटा ट्रस्ट सारखी कौशल्य विकासावर आधारित कंपनी येथे आणण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कौशल्य विकासावर आधारित उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी नागपूर येथे लाखो भाविक येतात. त्यांच्यासाठी दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतीवन या तिन्ही ठिकाणांना बुध्दिस्ट सर्किट म्हणून मान्यता मिळाली आहे. ड्रॅगन पॅलेस येथील तथागत गौतम बुध्दांची संपूर्ण चंदनाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी ॲड. सुलेखा कुंभारे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यांनी समाज सेवेचे हित लक्षात ठेवून चालविले कार्य पुढेही असेच सुरुच ठेवावे, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे यंत्रमाग विकसित करुन येथील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन द्यावा. तसेच कौशल्य विकासावर आधारित टाटा कन्सलटन्सी सारख्या कंपन्यांना येथे बोलविण्यात येऊन येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
00000000

No comments:

Post a Comment