Tuesday 11 October 2016

दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचे स्थळ म्हणून विकास - देवेंद्र फडणवीस

  • धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयाला लाखो भाविकांची उपस्थिती
  • एकात्मिक आराखडयानुसार दीक्षाभूमी स्मारक परिसराचा विकास
  • दादासाहेब गवईंच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये
  • इंदू मिलवरील स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात

नागपूर, दि.11 :  दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरच्या सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा सोहळा असून दीक्षाभूमीमुळे जागतिक स्थळावरील पर्यटक व उपासक येथे येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र दीक्षाभूमी स्मारक व परिसर अत्यंत सुंदर करण्यासाठी एकात्मिक आराखडयाला मान्यता दिली असून निश्चित कालावधीत आराखडयानुसार काम सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने 60 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपप्रज्वलीत करुन देशातून तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या लक्षावधी बुध्द अनुयायांसमोर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवींद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रविण दटके, श्रीमती कमलताई गवई, आंध्रचे माजी मंत्री श्रीधर बाबू, खासदार अजय संचेती, आमदार प्रकाश गजभिये, डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.
आम्हाला युध्द नको ही बुध्दाची भूमी आहे. जगात शांतीची स्थापना करायची असून जगाला गौतम बुध्दाचे विचार तारु शकतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार व्यक्त केले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मानवाच्या कल्याणाचा आत्मिक विचार पंचशीलाच्या विचारामध्ये आहे. ज्या देशांनी प्रगती व विकास साधला आहे, त्या देशांनी गौतम बुध्दाच्या विचारांचा स्विकार केला आहे. शांती व मानवतेकरिता कर्म कांडाच्या पलिकडे जाऊन पंचशीलाचे आचरण करुन मोठे होता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर केवळ संविधानाचे निर्माते नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते. अखंड राष्ट्राचे व विकासाची संधी पाहयला मिळते ते केवळ बाबासाहेबामुळे. सविधानाच्या माध्यतातून एकता व एकात्मतेच्या धाग्यामुळे राष्ट्र विकासाकडे जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर हे जागतिक नेते असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, युनो जगातील सर्व राष्ट्रांनी त्यांची 125 वी जयंती साजरी केली. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे यतोचित स्मारक व्हावे व हे स्मारक वादातीत असू नये यासाठी सर्वांना एकत्र घेऊन आराखडा तयार करण्यात आला असून त्यांना साजे असे भव्य स्मारकाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दादासाहेब गवई स्मारकासाठी 25 कोटी रुपये
माजी राज्यपाल व बाबासाहेब आंबडेकर स्मारक समितीचे माजी अध्यक्ष दादासाहेब गवई यांच्या दीक्षाभूमी स्मारकासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादासाहेब गवई यांचे यतोचित स्मारकासाठी अमरावती येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यांच्या कार्याची माहिती जनतेला व्हावी यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवींद म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी महाराष्ट्र असली तरी प्रेरणाभूमी ही बिहार आहे. भगवान गौतम बुध्द यांच्या प्रेरणेने सामाजिक अन्याय विरुध्दच्या लढयाला सुरुवात केली. शिक्षण तज्ञ, विधी तज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्विकारतांना राष्ट्रहीत सर्वोच्च मानून समाजातील शेवटच्या घटकला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी दिलेल्या समाज परिवर्तनाच्या विचाराच्या सर्वांनी स्विकार करुन आत्मसात करावा, असे प्रतिपादन केले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीमुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले असून या परिसराचा तसेच बुध्द सर्किटच्या प्रस्तावासाठी केंद्र शासनाने शंभर कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. बाबासाहेबांचे चिंतन व बुध्दांचा शांतीचा संदेश संपूर्ण जगात पोहचविण्याचा प्रयत्न करुन हा संदेश प्रत्येकाने येथून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाषणात बाबासाहेबांनी समाजाच्या उत्कर्षासोबतच विक्षमता दूर करण्यासाठी आयुषभर कार्य केले. सविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानता व न्याय मिळवून दिला. त्यामुळेच सामान्य व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो. आरक्षणाला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण मिळावे, अशी भूमीका असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, दीक्षाभूमीवर लाखो भाविक येत असून त्यांना जागा कमी पडत आहे. या परिसराचा विकास करतांना आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन द्यावी. केंद्र शासनातर्फे याकरिता आवश्यक सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रविण दटके, आंध्रचे माजी मंत्री श्रीधर बाबू यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणात भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी बिहाराच्या राज्यपालांनी दिलेली भगवान गौतम बुध्दांची प्रतिमा दीक्षाभूमीसाठी महत्वाची आहे. बौध्द गया येथील गौतम बुध्दांच्या विचारासंदर्भातही यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकात दीक्षाभूमीच्या विकास व विस्तारासाठी केंद्र व राज्य शासनाची सभोवतालची जागा स्मारक समितीला मिळावी, अशी मागणी करतांना येथील शैक्षणिक विकासासाठी तसेच विधी महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली. जगातील बौध्द बांधवांना आंबेडकरी चळवळीचा इतिहास माहिती व्हावा यासाठी वेबसाईट व मोबाईल ॲप्स तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्मारक समितीतर्फे डॉ. राजेंद्र गवई, आर्यन सुटे, विजय चिकाटे यांनी स्वागत  व आभार प्रदर्शन यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. यावेळी स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनीधी व असंख्य भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित होते.
00000000

No comments:

Post a Comment